Pune News : शिक्षणाचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आता आयटी हब म्हणून ओळखले जाते. दरम्यान पुणे शहराचा झपाट्याने होणारा विस्तार पाहता पुण्याला नव्या विमानतळाची गरज होती आणि याचमुळे आता पुणे जिल्ह्यात एक नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित केले जात आहे. जिल्ह्यातील पुरंदर येथे हे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होत असून याच नव्या विमानतळ प्रोजेक्ट संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.
काय आहे अपडेट?
मिळालेल्या माहितीनुसार पुरंदर विमानतळात बाधित होणाऱ्या जमीन मालकांना त्यांच्या जमिनीसाठी किती मोबदला दिला जाईल याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून यामुळे पुरंदर विमानतळात बाधित होणाऱ्या सात गावांमधील संबंधित जमीन मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि यामुळे राज्यातील सर्व आमदार आणि मंत्री मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान याच अधिवेशनादरम्यान राजधानी मुंबईत सरकारकडून वेगवेगळे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.
काल मुंबई येथे पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे सुद्धा उपस्थित होते आणि संबंधित विभागातील अनेक प्रमुख अधिकारी देखील या बैठकीला हजर होते. दरम्यान या बैठकीत पुरंदर विमानतळात बाधित होणाऱ्या जमीन मालकांना किती मोबदला मिळणार हे फिक्स करण्यात आले आहे.
किती मोबदला मिळणार?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालच्या बैठकीत पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना त्यांच्या जमिनीच्या बदल्यात एकूण जमिनीपैकी 10 टक्के विकसित भूखंड आणि जमिनीच्या सध्याच्या बाजारभावाच्या चार पट रक्कम मोबदला म्हणून दिली जाणार आहे.
एवढेच नाही तर बाधित जमीन मालकांच्या कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरीमध्ये संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. संमतीने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना आणि जमीन मालकांना याचा फायदा होणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी संमतीने जमीन देणार नाहीत त्यांना फक्त त्यांच्या जमिनीच्या चार पट रक्कम मोबदला म्हणून दिली जाणार आहे.
म्हणजेच अशा शेतकऱ्यांना दहा टक्के विकसित भूखंड मिळणार नाही आणि सरकारी नोकरीमध्ये कुटुंबातील सदस्यांना संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही. तसेच या प्रकल्पासाठी 2019 च्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला दिला जाणार असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. नक्कीच या सदरील बैठकीमुळे या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला गती मिळणार आहे.
ह्या गावांमध्ये होणार जमिनीचे भूसंपादन
पुरंदर विमानतळ प्रकल्प हा पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमध्ये विकसित होणार आहे. या सदरील सात गावांमधील 2 हजार 673 हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प आकार घेणार आहे म्हणजेच या प्रकल्पासाठी इतकी जमीन लागणार असून लवकरच याचे भूसंपादन करण्यात येणार आहे.