Employment News : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली आणि सध्या स्थितीला देशभरातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही गाडी सुरू आहे.
सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवण्यात आली होती. या गाडीला अगदी सुरुवातीपासूनच प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि यामुळे ही गाडी संपूर्ण देशात सुरू करण्यात येत आहे.

आगामी काळात या गाड्यांची संख्या आणखी वाढणार आहे. दरम्यान आता वंदे भारत एक्सप्रेस च्या संदर्भात एक मोठी माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार झारखंड राज्यातील जमशेदपूर जिल्ह्यात आता वंदे भारत ट्रेनचे कोचं म्हणजे डब्बे तयार करण्यात येणार आहेत.
जमशेदपूर जिल्ह्यातील चाकुलियामध्ये ‘वंदे भारत’ ट्रेनचे कोच (डबे) तयार करणारी एक फॅक्टरी उभारण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प 300 एकर जमिनीवर उभारण्यात येणार आहे.
कसा असणार प्रकल्प?
जमशेदपूर येथे उभारला जाणारा हा प्रकल्प 300 एकर जमिनीवर उभारला जाईल आणि यासाठी जवळपास 4000 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. यामुळे हजारो नवीन रोजगारांची निर्मिती होईल आणि झारखंड या आदिवासीबहुल राज्यातील या सदरील भागातील विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त होतोय.
दरम्यान या प्रकल्पाच्या संदर्भात अलीकडेच जमशेदपूर परिसदन येथे बहरागोड़ा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुमार मोहंती आणि एमएस वोल्टास रेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये एक महत्त्वाची आढावा बैठक झाली आहे. या बैठकीत कंपनीकडून प्रोजेक्ट डायरेक्टर व सल्लागार विष्णु गर्ग उपस्थित होते.
पुढील टप्प्यात आणखी 400 एकर जमीन लागणार
या बैठकीनंतर कंपनीकडून असं सांगितलं गेलं आहे की, ही ईस्ट झोनमधील पहिली अशी मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल, जी वंदे भारतसारख्या देशाच्या अभिमानास्पद योजनेंतर्गत कोच तयार करणार आहे.
तसेच या प्रकल्पांतर्गत पुढील टप्प्यात आणखी 400 एकर जमीन अधिग्रहित करून या प्रकल्पाचा विस्तार केला जाणार आहे. महत्त्वाची बाब अशी की पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात या प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि कंपनी यांच्यात एमओयूवर स्वाक्षरी होणार आहे.