Mumbai Vande Bharat Train : सध्या देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईतून 6 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या सहा मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहेत.
दरम्यान मुंबईवरून धावणाऱ्या मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या संदर्भात रेल्वे मंत्रालयाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबई ते गांधीनगर वंदे भारत ट्रेनसाठी एक अतिरिक्त थांबा मंजूर केला आहे.

आता या रेल्वे स्थानकावर थांबणार वंदे भारत
रेल्वे मंत्रालयाने मुंबई ते गांधीनगर वंदे भारत ट्रेनला वलसाड रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे वलसाड व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना वंदे भारतची भेट मिळणार असून यामुळे या परिसरातील प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त करण्यात आले आहे.
वलसाड मधील रेल्वे प्रवाशांना या निर्णयामुळे जलद गतीने मुंबईत पोहोचता येणार आहे. खरे तर, या रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनला थांबा मिळावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून विशेष प्रयत्न सुरू होते आणि आजअखेर या प्रयत्नांना यश आले आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबत एक अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात असे म्हटले आहे की, रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई सेंट्रल – गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस म्हणजेच गाडी क्रमांक 20901/20902 या गाडीला वलसाड स्थानकावर थांबा देण्यासाठी अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब अशी की, रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी सुरू होणार असल्याचा दावा केला जातोय. हा निर्णय घेतानाच रेल्वे प्रशासनाकडून वलसाड स्थानकावर वंदे भारतसाठी किती तिकिटांची विक्री होते यावर लक्ष ठेवण्याचे आदेश सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र, वलसाड स्थानकावरील त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही परंतु लवकरच ते देखील जाहीर केले जाईल असे मानले जात आहे.
मुंबई – गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेसचे स्टॉपेज
सध्या मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन या मार्गावरील अहमदाबाद, वडोदरा, आनंद, सुरत, वापी आणि बोरिवली या रेल्वे स्थानकावर थांबते. दरम्यान आता या गाडीला वलसाड रेल्वे स्थानकावर सुद्धा थांबा मंजूर करण्यात आला आहे. म्हणून येत्या काही दिवसांनी प्रत्यक्षात ही गाडी वलसाड रेल्वे स्थानकावर थांबा घेताना दिसणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर वलसाडचे खासदार धवल पटेल यांनी पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार सुद्धा मानले आहेत.