श्रीगोंदा- विकासासाठी तसेच दळणवळणसाठी रस्ते उभारणीत ज्या पद्धतीने वृक्षतोड करण्यात आली, त्या पद्धतीने वृक्षलागवडीकडे मात्र कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. रस्ते विकासाच्या नव्या धोरणात तीन पट नवीन वृक्षलागवड असली तरी रस्ते पूर्ण होऊन काही वर्षाचा काळ उलटला असताना अद्याप वृक्ष लागवडीला प्रारंभ झालेला दिसत नसल्याने झाडांची सावली मिळण्यास किती वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वृक्षतोडीसाठी परवानगी देणारा वनविभाग देखील झोपलेला असल्याचे दिसून येत आहे.
विकासाच्या नावाखाली राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा, तालुक्यासह गावांच्या छोट्या रस्त्यांच्या कामासाठी हजारो जुन्या वृक्षांची कत्तल करुन शासनाने – हाती घेतलेल्या हजारो कोटी रुपये खर्च करुन दरवर्षी लाखो नव्या वृक्ष लागवड मोहीमेला हरताळ फासला जात आहे. श्रीगोंदा तालुक्यात गेली काही वर्षात राष्ट्रीय, राज्य तसेच तालुका पातळीवरील विविध रस्त्यांची कामे सुरु आहेत. रस्ते विकसित करण्यासाठी रस्त्याच्या कामात अडथळा ठरर्णाया हजारो वृक्षसंपदेची कत्तल करण्याचे काम अविरत सुरू आहे.

तालुक्यातून जाणाऱ्या नगर दौंड, काष्टी आढळगाव मार्गे जामखेड, सोलापूर या तीन राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन काही वर्ष लोटले. या रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या शेकडो वर्षाच्या हजारो वृक्षांची या कामासाठी कत्तल करण्यात आली. तसेच पेडगाव श्रीगोंदामार्गे मांडवगण, कोळगाव श्रीगोंदा, गव्हाणवाडी बेलवंडी मार्गे श्रीगोंदा या राज्य महामार्गाच्या कामासाठी देखील हजारो वृक्षसंपदेची तोड करण्यात आली आहे.
यासाठी वनविभागाकडे संबंधित रस्त्यांच्या ठेकेदारांनी परवानगी काढली. वृक्ष तोड परवानगी देताना तोडलेल्या वृक्षांच्या जागेवर महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) अधिनियम १९६४ च्या कलम ३ (ब) महाराष्ट्र शासन राजपत्र भागचार दि.१०/०८/१९८९ अन्वये केलेल्या सुधारणा कलम बी- ३ अन्वये वृक्ष तोड झालेल्या ठिकाणी किंवा जवळच्या ठिकाणी वृक्ष तोडीच्या तीन पटीत वृक्ष तोडीनंतर येणाऱ्या पावसाळ्यात किंवा एक वर्षाच्या आत वृक्षलागवड करण्याचे आदेश देण्यात आले होते.
मात्र तालुक्यातून जाणाऱ्या नगर दौंड, काष्टी आढळगाव मार्गे जामखेड, सोलापूर या तीन राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन काही वर्ष लोटले. मात्र रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवडीच्या दिलेल्या अटीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विसर पडला असल्याचे दिसून येत असताना वनविभागाने वृक्ष तोडीसाठी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी वनविभागाची देखील अनास्था असल्याचे त्यांनी या बाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे कोणताही पाठपुरावा केला नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून समजले.