अहिल्यानगर- नगर जिल्ह्यात आतापर्यंत ९३.९८ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध पिकांच्या ६ लाख ५० हजार ९८८ हेक्टरवर खरीप पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक १ लाख ७० हजार ६३१ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११३.६ मिमी पावसाची नोंद झाली. मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप पिकांचे सरासरी ७ लाख १६ हजार २०८ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये आतापर्यंत ६ लाख ५० हजार ९८८ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात भात पिकाचे सरासरी क्षेत्र १८ हजार ७४५ असून आतापर्यंत ६१५५ हेक्टरवर भात पिकाची लावणी झाली. बाजरी पिकाचे सरासरी ८९ हजार ६२९ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ५६ हजार ६२० हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली.

मका पिकाचे सरासरी क्षेत्र ७७ हजार ९९९ हेक्टर असून आतापर्यंत ९५ हजार ६६३ हेक्टरवर मकाची पेरणी झाली. तूर पिकाखालील ६४ हजार ५८४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी ६४ हजार ८५५ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली. जिल्ह्यात मूग पिकाखालील ५१ हजार ९८० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ४७ हजार ७०७ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली. उडीद पिकाखालील जिल्ह्यात ६७ हजार ५९५ हेक्टर क्षेत्र आहे. उडीदाची आतापर्यंत ६६ हजार ९७ हेक्टरवर पेरणी झाली.
भुईमुगाचे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र ६५९९ हेक्टर असून आतापर्यंत भुईमुगाची ४१९१ हेक्टरवर पेरणी झाली. तीळ पिकाचे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र ८३.३८ हेक्टर आहे. आतापर्यंत १७ हेक्टरवर तिळाची पेरणी झाली. सूर्यफूल पिकाचे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र २१७ हेक्टर आहे. आतापर्यंत ४३ हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी झाली. सोयाबीनचे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र १ लाख ७८ हजार ५३८ हेक्टर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ७० हजार ६२१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. जिल्ह्यात कपाशीखालील सरासरी क्षेत्र १ लाख ५५ हजार ३२८ हेक्टर आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ८८६ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसात खंड पडल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात २० जुलैअखेर ११३.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना दमदार पावसाची – प्रतीक्षा आहे.
मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परंतु हा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त नाही. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी ईमामेक्टीन बेन्झोंएट ५ टक्के प्रतिलिटर पाण्यात तसेच ५ टक्के निंबोळी अर्क ५० मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मका पिकावरील तांबूसपणावरील नियंत्रणासाठी स्फुरदयुक्त खते व सुक्ष्म मुलद्रव्य फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले.
कापूस पिकावर मावा व तुडतुड्याचा प्रादुर्भाव
कापूस पिकावर काही प्रमाणात मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परंतु हा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त नाही. याच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस ५० ई. सी. मिली तसेच तुडतुड्यांसाठी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा डायमेथोएट प्रति १० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याची शिफारस करण्यात येत आहे.