वन विभागाच्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन निलंबन करण्याची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मढी, केळवंडी व करडवाडी या भागातील तीन बालकांचा नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्याने मयत झाले आहे.

वन विभागाच्या निष्क्रियतेने या बालकांचा बळी गेला असून, वन विभागाच्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन, कामचुकारपणे वागणार्‍या कर्मचार्‍यांच्या निलंबन करण्याची मागणी जय भगवान महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद लहामगे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व वन मंत्री संजय राठोड यांना निवेदन ईमेलद्वारे पाठवून केली आहे.

गुरुवार दि.29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी नरभक्षक बिबट्याने करडवाडी शिवारात वस्तीवर राहणार्‍या संजय बुधवंत यांच्या सार्थक नावाच्या चार वर्षीय मुलाला घराच्या अंगणातून आईदेखत उचलून नेले. यामध्ये या बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. हद्दीचे कारण दाखवत वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी टोलवाटोलवी केली.

नरभक्षक बिबट्याची ग्रामीण भागात प्रचंड दहशत वाढली आहे. लहान मुले अत्यंत भयभीत झाले आहे. गटागटाने माणसे गावात वावरत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात पहिल्या मुलाचा बळी गेल्यानंतर तरी देखील वन विभागाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज होती.

मात्र वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपले अंग काढून कामात कुचराई करीत आहे. करडवाडी येथे नरभक्षक बिबट्याने मुलास जीवे मारले असता मुलाचे वडील मुंबईहून शुक्रवारी सकाळी गावी परतले. पण वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात असून देखील दुपारी बारापर्यंत घटनास्थळी येऊ शकले नाहीत.

यावरुन त्यांची अनास्था लक्षात येते. तर काही वनविभागाचे कर्मचारी नशेत असल्याचे आढळले आहे. गुरुवारी रात्री माहिती घेण्यासाठी गावातील काही नागरिक वन विभागाच्या पाथर्डी कार्यालयात गेले असता. तेथील बहुतेक कर्मचारी व अधिकारी दारुच्या नशेत होते. त्यांना मदतीसाठी विनवनी केली असता त्यांनी हद्दीचा विषय पुढे करुन काढता पाय घेतला.

जिल्ह्यातील वन विभागच पुर्णत: निष्क़्रीय झाले असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. दारु ढोसून काम न करणे, तीसर्‍या बळी जाऊन देखील अधिकारी घटनेची गंभीर दखल न घेता उशीरा पोहचणे तसेच हद्दीचा विषय पुढे करुन कामात कुचराई करण्याचे सर्व घटनेतून दिसत आहे.

तरी या सर्व कामचुकार निष्क्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच कामचुकार करणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांचे निलंबन करण्याची मागणी जय भगवान महासंघाच्या वतीने लहामगे यांनी मुख्यमंत्री व वन मंत्री यांच्याकडे केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe