7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. महागाई भत्ता वाढी बाबतची एक लेटेस्ट आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार जुलै 2025 पासून महागाई भत्ता किती वाढणार याचा तज्ञांकडून अंदाज बांधला जात आहे.
खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढवला जात असतो.

जानेवारी चा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय हा साधारणता मार्च महिन्यात आणि जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय साधारणतः सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात होतो. 2025 मध्ये जानेवारीपासूनचा महागाई भत्ता वाढला आहे मात्र जुलैची महागाई भत्ता वाढ बाकी आहे.
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 55% दराने महागाई भत्ता दिला जात आहे. मार्चमध्ये महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका करण्यात आला आणि वाढ जानेवारी 2025 पासून लागू झाली.
जुलै पासून महागाई भत्ता किती वाढणार?
जुलै महिन्यापासून ची महागाई भत्ता वाढ जानेवारी ते जून 2025 या काळातील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरणार आहे. जून 2025 पर्यंत CPI-IW चे संपूर्ण आकडे अद्याप जाहीर झालेले नाहीत. मात्र तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण महागाईचे आकडे काहीसे कमी झाले आहेत.
मे महिन्यात CPI-AL (कृषी कामगारांसाठी) आणि CPI-RL (ग्रामीण कामगारांसाठी) घसरले आहेत. तज्ञांनी असेही स्पष्ट केले आहे की CPI-AL आणि CPI-RL थेट DA गणनेसाठी वापरले जात नाहीत. मात्र ही आकडेवारी महागाईच्या एकूण प्रवृत्तीचे निदर्शक असतात, यामुळे या आकडेवारीवरून महागाई भत्ता वाढीचा अंदाज लावता येऊ शकतो.
दरम्यान हीच आकडेवारी पाहता तज्ञांनी यावेळी महागाई भत्ता तीन ते चार टक्क्यांनी वाढेल असे म्हटले आहे. म्हणजेच महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून थेट 58 टक्क्यांवर किंवा 59 टक्क्यांवर जाऊ शकतो.
पगार किती वाढणार?
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासूनच महागाई भत्ता वाढ लागू केली जाणार आहे मात्र याचा अधिकृत शासन निर्णय हा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात निघेल अशी माहिती तज्ञांकडून देण्यात आली आहे. म्हणजेच सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पगारा सोबतच याचा रोख लाभ मिळणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत बोलायचं झालं तर 18,000 मूळ पगारा असणाऱ्या कर्मचाऱ्याला सध्या 55% दराने 9900 इतका डीए मिळत असून याच कर्मचाऱ्याला 4% वाढीनंतर म्हणजे 59% डीए झाल्यानंतर दहा हजार 620 रुपये इतका डीए मिळणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये 720 रुपयांची वाढ होणार आहे.