जपानच्या जगप्रसिद्ध शिंकानसेन (Shinkansen) बुलेट ट्रेनचा वेग, अचूकता आणि आधुनिकता अनुभवण्याची संधी आता भारताला मिळणार आहे. तुम्ही कल्पना करू शकता का, दिल्लीहून पाटणा हे 1,000 किलोमीटर अंतर केवळ 2.5 तासांत पार करणे शक्य होईल? हो, हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण जपानमधील सर्वात वेगवान ट्रेन, E10 शिंकानसेन, लवकरच भारताच्या रेल्वे रुळांवर धावू शकते.

भारतातील रेल्वे नेटवर्क आधीच जगातील सर्वात मोठ्यांपैकी एक आहे. पण आता ते केवळ विस्तीर्ण नसून, अत्याधुनिक आणि वेगवानही बनणार आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान सुरू असलेल्या भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपानच्या प्रसिद्ध E5 शिंकानसेन गाड्यांचा वापर होणार आहे. या गाड्यांची चाचणी 2026-27 च्या सुमारास गुजरातमध्ये होईल. आणि जर सर्व काही अपेक्षेप्रमाणे पार पडलं, तर याच चाचणीच्या आधारे त्याहूनही प्रगत E10 मॉडेल भारतात आणलं जाईल.
E10 शिंकानसेन
E10 शिंकानसेन ही फक्त एक वेगवान ट्रेन नाही, तर ती जपानी तंत्रज्ञानाचा सर्वोच्च नमुना आहे. ‘अल्फा एक्स’ या नावानेही ओळखली जाणारी ही ट्रेन ताशी 400 किमी वेगाने धावू शकते. त्यामुळे 1,000 किमीचं अंतर जे सध्या 12 तासांपेक्षा जास्त वेळ घेतं, ती केवळ 2.5 तासांत पार करू शकते. याच वेगामुळे दिल्ली-पाटणा किंवा मुंबई-अहमदाबाद हे शहरं जवळपास शेजारी वाटू लागतील.
भारतात सुरू होणाऱ्या हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरवर या शिंकानसेन गाड्या 508 किमीच्या मार्गावर धावतील. एका अंदाजानुसार, अहमदाबादहून मुंबई हे अंतर ही ट्रेन सुमारे सव्वा तासात पार करेल. या प्रकल्पाला केवळ भारत सरकारच नव्हे, तर जपान सरकारकडूनही पूर्ण पाठिंबा मिळत आहे. दोन्ही देशांमधील धोरणात्मक सहकार्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
2030 पर्यंत मिळणार सुविधा?
या प्रकल्पामुळे भारतात रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार आहे. वेळ वाचवणं, प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायक करणं, आणि एकूणच आधुनिक यंत्रणेकडे वाटचाल करणं हे सगळं एका पिढीसाठी ऐतिहासिक ठरेल. 2030 साल हे यासाठी निर्णायक ठरणार आहे. या वर्षीपर्यंत भारतात E10 शिंकानसेन सुरू होण्याची शक्यता आहे.