भारतानं अलीकडील काळात लष्करी क्षेत्रात जी झेप घेतली आहे, ती केवळ तांत्रिक प्रगती नव्हे, तर एका स्वाभिमानी राष्ट्राची भविष्याची तयारी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता ‘ऑपरेशन सामना’ची दिशा ठरली आहे. हे केवळ लढाईसाठीच नव्हे, तर आत्मनिर्भर भारताच्या वचनबद्धतेचंही प्रतीक आहे. भविष्यातील युद्धं पारंपरिक नसतील, ती बुद्धिमत्तेच्या, यंत्रणांच्या आणि वेगाने बदलणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या आधारावर लढली जातील. भारताने हे वेळेवर ओळखलं असून, याच तयारीतून त्याने पाच अत्याधुनिक स्वदेशी शस्त्रप्रणालींवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’मधून जी शिकवण मिळाली, ती भारताने गांभीर्यानं घेतली आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि आकाश संरक्षण प्रणाली ही आधीच यशस्वी ठरलेली आहेत, आणि आता त्याच धर्तीवर नव्या पिढीची शस्त्रं भारतातच विकसित केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर देशानं एक व्यापक लष्करी धोरण आखलं असून, त्यात समुद्री, आकाश आणि जमीन या तिन्ही पातळ्यांवर उच्चस्तरीय शस्त्रसज्जतेचा समावेश आहे.
3 प्रगत पाणबुड्या
मुंबईतल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला 1.06 लाख कोटी रुपयांचा एक विशाल प्रकल्प देण्यात आला आहे. या अंतर्गत तीन स्कॉर्पिन प्रकारच्या प्रगत पाणबुड्या तयार होत आहेत, तर मुंबईतच दोन नवे बेसिन 5,000 कोटी रुपये खर्चून बांधले जात आहेत. हे नवे तळ भारताच्या नौदल क्षमतेला एक वेगळंच बळ देणार आहेत.
ड्रोनच्या बाबतीत भारतानं अगदी आक्रमक आणि आत्मनिर्भर भूमिका घेतली आहे. बेंगळुरूमधील DRDO च्या प्रयोगशाळांमध्ये सुस्पष्ट टार्गेट नष्ट करणारे ‘कामिकाझे’ ड्रोन तयार होत आहेत. शिवाय, अमेरिकेकडून प्रीडेटर ड्रोन खरेदी करतानाच, 2027 पर्यंत ‘APAS-BH’ हे स्वदेशी पाळत ठेवणारे ड्रोन तयार करण्याचं लक्ष्यही निश्चित करण्यात आलं आहे.
हायपरसोनिक क्षेपणास्त्र
भारतीय लष्कर आणि DRDO संयुक्तपणे आता अशा क्षेपणास्त्रांवर काम करत आहेत, जी शत्रूच्या कोणत्याही हालचालीला वेळीच रोखू शकतील. ब्रह्मोस-2 हायपरसोनिक क्षेपणास्त्राची 1,500 किमीची श्रेणी असणार आहे. याशिवाय, रेडिएशनविरोधी रुद्रम-2 आणि रुद्रम-3, आकाश आणि QRSAM ही क्षेपणास्त्रं लवकरच भारतीय लष्कराच्या ताफ्यात सामील होण्याची शक्यता आहे.
AI ड्रोन
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शस्त्रांवर भारत विशेष भर देतो आहे. AI आधारित रणगाडे, ड्रोन आणि थेट युद्धभूमीवर नजरेस न पडणाऱ्या हालचाली टिपणारी यंत्रणा ही सगळी प्रगती युद्धाच्या पारंपरिक संकल्पनांना मागे टाकणारी आहे.
रडार यंत्रणा
रडार यंत्रणेमध्येही भारत स्वदेशी उत्पादनाकडे वळला आहे. ‘D4S अँटी-ड्रोन’ प्रणाली, तसेच AEW&C (Airborne Early Warning & Control) रडार तयार करण्यात येत आहेत. हे रडार शत्रूच्या हालचाली लक्षात घेऊन लवकरच त्यांच्या कारवायांना हाणून पाडतील.
या सर्व तयारीकडे केवळ एक प्रकल्प किंवा यंत्रणा म्हणून न पाहता, ती भारताच्या संरक्षण धोरणातील एक भविष्यदर्शी पावलं म्हणून पाहणं गरजेचं आहे. भारत आता केवळ युद्धात भाग घेणारा देश नसून, युद्धाची परिभाषा बदलणारा देश बनण्याच्या मार्गावर आहे. आणि यामध्ये स्वदेशी शस्त्रनिर्मितीचं हे पाऊल निर्णायक ठरणार आहे.