India’s Valuable Company : भारत हा जलद गतीने विकसित होणारा देश. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था. विशेष म्हणजे अर्थतज्ज्ञांनी येत्या काही वर्षांनी भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा सुद्धा विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत वेगवेगळ्या क्षेत्रांचा वाटा आहे.
दरम्यान आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेत ज्या उद्योगांचा मोलाचा वाटा आहे त्या उद्योगांची माहिती पाहणार आहोत. आज आपण मार्केट कॅपिटल नुसार देशातील सर्वाधिक मोठ्या 10 कंपन्यांची माहिती जाणून घेणार आहोत. या सर्व कंपन्या स्वदेशी आहेत चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊयात देशातील टॉप 10 सर्वाधिक मोठ्या कंपन्या.

मार्केट कॅपिटल नुसार भारतातील सर्वाधिक मोठ्या टॉप 10 कंपन्या
आयटीसी लिमिटेड : भारतातील सर्वाधिक मोठ्या टॉप दहा कंपन्यांच्या यादीत या कंपनीचा दहावा नंबर लागतो. आयटीसी लिमिटेडचा समूह एफएमसीजी, हॉटेल्स, कृषी व्यवसाय आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे. आयटीसी लिमिटेडचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. या कंपनीच्या लोकप्रिय ब्रँडमध्ये आशीर्वाद, सनफीस्ट आणि क्लासमेट यांचा समावेश होतो. या समूहाचे इतरही अनेक लोकप्रिय ब्रँड आहेत.
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड : मार्केट कॅपिटल नुसार देशातील सर्वाधिक मोठ्या टॉप 10 कंपन्यांमध्ये या कंपनीचा नववा नंबर लागतो. एचयूएल ही भारतातील सर्वात मोठ्या वेगाने वाढणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी) कंपन्यांपैकी एक आहे. या समूहाचे मुख्यालय मुंबईत आहे. फूड अँड बेवरेजेस, होम केअर आणि पर्सनल केअर मध्ये या समूहाचे अनेक ब्रँड आपल्याला पाहायला मिळतात.
बजाज फायनान्स लिमिटेड : या यादीत बजाज फायनान्स लिमिटेड आठव्या क्रमांकावर येते. ही एक आघाडीची एनबीएफसी म्हणजेच नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यात आहे.
इन्फोसिस लिमिटेड : मार्केट कॅपिटल नुसार सर्वाधिक मोठ्या टॉप 10 कंपन्यांमध्ये या कंपनीचा सातवा नंबर लागतो. या कंपनीचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. इन्फोसिस डिजिटल सेवा आणि सल्लागार क्षेत्रात जागतिक आघाडीवर आहे. ती कंपनी पन्नास हुन अधिक देशांमध्ये ग्राहकांना सेवा देत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया : या यादीत भारतातील सर्वाधिक मोठी सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाचा सहावा नंबर लागतो. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय हे देशाच्या आर्थिक राजधानी अर्थातच मुंबईत आहे.
आयसीआयसीआय बँक : या यादीत देशातील आणखी एका बड्या बँकेचा समावेश होतो. भारतातील सर्वाधिक मोठ्या व्हॅल्युएबल कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय बँक ही पाचव्या नंबरवर येते. ही एक प्रायव्हेट बँक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या बँकेचे मुख्यालय सुद्धा आपल्या मुंबईत आहे.
भारती एअरटेल लिमिटेड : भारतातील सर्वाधिक मोठ्या व्हॅल्युएबल कंपन्यांमध्ये भारतीय एअरटेल लिमिटेड ही कंपनी चौथ्या नंबरवर येते. ही देशातील एक आघाडीची जागतिक दूरसंचार कंपनी आहे. भारतीय एअरटेल लिमिटेडचे सध्या स्थितीला 18 देशांमध्ये कामकाज सुरू आहे. या कंपनीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस : या यादीत टीसीएसचा तिसरा नंबर लागतो. टीसीएस ही टाटा समूहाची एक उपकंपनी आहे. ही आयटी उद्योगातील सर्वात मोठ्या नियोक्त्यांपैकी एक आहे. टीसीएस आयटी सेवा, सल्लागार आणि व्यवसाय उपायांमध्ये व्यवहार करते. या कंपनीचे मुख्यालय सुद्धा आर्थिक राजधानी मुंबईत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही कंपनी तब्बल 46 देशांमध्ये कार्यरत आहे. ही एक मल्टिनॅशनल कंपनी आहे.
एचडीएफसी बँक लिमिटेड : देशातील सर्वाधिक मार्केट कॅपिटल असणाऱ्या कंपन्यांच्या यादीत एचडीएफसी बँक लिमिटेडचा दुसरा नंबर लागतो. या बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. ही प्रायव्हेट बँक मार्केट कॅपिटल नुसार एसबीआय आणि आयसीआयसीआयपेक्षा मोठी आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड : देशातील सर्वाधिक मार्केट कॅपिटल असणाऱ्या कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा पहिला नंबर लागतो. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील आरआयएल ही कंपनी पेट्रोकेमिकल्स, रिफायनिंग, रिटेल, टेलिकम्युनिकेशन्स आणि डिजिटल सेवांमध्ये कार्यरत आहे.