अहिल्यानगर : श्रावण महिन्यानिमित्त नाथ संप्रदायाचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे सध्या भाविकांच्या स्वागताला निसर्ग सर्व बाजूंनी फुलला असून निसर्गाशी मुक्त संवाद साधण्याला व स्वयंभू महादेवाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी सुरू झाली आहे. दुर्मिळ वनौषधींसाठी वृद्धेश्वर डोंगररांगांचा परिसर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. नाथ संप्रदायाचे उगमस्थान म्हणून वृद्धेश्वराकडे बघितले जाते. येथे स्वयंभू शिव पिंडी असून पिंडीच्या मध्यभागातून अहोरात्र पाझरणाऱ्या पाण्याला भाविक गंगा स्वरूप मानतात.
अहिल्यानगर पासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे स्थान आहे. वर्षभर येथे भाविकांची वर्दळ असते. अत्यंत निसर्गरम्य अशा परिसरात भटकंती करताना मूकपणे निसर्ग आपल्याशी बोलतो असा भास होणारा हा पवित्र परिसर आहे. येथील कणाकणात शिवाचे अस्तित्व जाणवते. येथून जवळच नऊ किलोमीटर अंतरावर मच्छिंद्रनाथांची मायंबा येथे संजीवन समाधी आहे. तेवढ्याच अंतरावर उत्तर दिशेला मढी येथे कानिफनाथांची संजीवन समाधी आहे. दर अमावस्येला येथे आषाढी सारखी गर्दी होते.

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी पाश्चात्य शास्त्रज्ञ डॉ. अल्मेडा परिसर अभ्यासासाठी आले होते. सुमारे तीन दिवस त्यांनी संपूर्ण परिसर पायी फिरून अभ्यास केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात किमान २०० अशा दुर्मिळ प्रजाती आहेत. त्यांचे नामकरण करावे लागेल. राज्य शासनाने हा परिसर अभ्यासकांसाठी संरक्षित करायला हवा. येथील काही प्रजाती संपूर्ण विश्वाला कल्याणकारी ठरणारे आहेत. वनस्पती पासून मौल्यवान धातू तयार करणे, संजीवनी वनस्पती, विविध प्रकारच्या दुर्धर आजारांवर वापरात येणाऱ्या वनस्पती, एवढेच नव्हे तर तहानभूक न लागणारे सुद्धा वनस्पती या परिसरात आहेत. असे त्यांनी त्यावेळी जाहीर केले होते.
त्यांच्या बोलण्याची प्रचिती म्हणजे नाथ संप्रदायाचे उपासक महिनो महिने कित्येक दिवस अन्न पाण्या वाचून ध्यानधारणा करत. तरीही ते अत्यंत तेजपुंज दिसत. नवनाथ ग्रंथांमध्ये उल्लेख केलेल्या महायज्ञाचे स्थान सुद्धा वृद्धेश्वर येथे असून जेथे देवाधिदेव महादेव अंतर्धान पावली तेथे शिवपिंड निर्माण झाली. तथा गुरु गोरक्षनाथांनी सुवर्णसिद्ध मंत्राने संपूर्ण गर्भगिरी परिसर ज्या जागेवरून केला ती हीच जागा, त्यानंतर जालिंदरनाथांनी जेथे मंत्राने अग्नी पेटविला ती भव्य अशी विशाल दगडी धुनी आजही प्रज्वलित आहे. गुरु मच्छिंद्रनाथांच्या इच्छेखातर गोरक्षनाथांच्या पुढाकाराने जो महायज्ञ नाथकालात झाला त्यासाठी ३३ कोटी देव यज्ञाच्या सांगतेसाठी व महाप्रसादासाठी येथे उपस्थित होते. ती हीच जागा.
अनेक अभ्यासकांनी योग साधना व ध्यानधारणेतून अभ्यास करत बारा ज्योतिर्लिंगाचे स्थान याच पिंडीवर असल्याचे स्पष्ट केले आहे. येथील दर्शन तेवढ्याच दैवी शक्तीचे फल देणारे ठरते असे नाथ संप्रदायाच्या साहित्यामध्ये सांगितले आहे. योगायोगाने या वर्षी त्या परिसरावर पावसाची कृपा असून तेथे सर्व बंधारे व तलाव भरलेले आहेत. निसर्ग फुलला आहे. धुंद वारे वाहते, निरव शांतता, रानफुलांचा सुगंध, अशा वातावरणात शिवपुजा करण्याचा आध्यात्मिक आनंद भाविकांना वेगळी अनुभूती देणारा ठरतो.
देवस्थान समितीने विकास कामांचा वेग वाढवला असून अत्यंत आकर्षक व भाविकांसाठी आवश्यक असलेले बांधकामे चांगल्या पद्धतीने सुरू केली आहेत. दगडी ओवऱ्या, अष्ट महासिद्धी, स्वयंभू गणपती मंदिर बांधून पूर्ण झाले असून अष्टमहासिद्धीसह शिवस्थान असल्याने सिद्ध योग्यांचे हे आराध्य दैवत ठरते. शिवाच्या ठिकाणी महासिद्धीचे अस्तित्व फक्त उत्तर भारतातील स्वयंभू मंदिरामध्ये आहे. ऋषिपंचमी पर्यंत येथे दररोज सायंकाळी आठ वाजता होणारी बेल आरती साक्षात शिव अनुभूती देणारी ठरते. शंकर महाराज, साईबाबा, संत ज्ञानेश्वर व त्यांची सर्व भावंडे अशा अशा विविध संत महंत व साधकांनी अवलिया सत्पुरुषांनी येथे भेट देऊन शिव अनुभूती अनुभवली आहे. साद देती हिमेश शिखरे या पुस्तकामध्ये सुद्धा येथील वर्णन विस्तृत प्रकारे केले आहे. प्रत्येक संत कवीने सुद्धा आपल्या साहित्यातून वृद्धेश्वराच्या स्थानाचे वर्णन केले आहे.
ग्रंथराज ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी ज्ञानदेवांनी येथे येऊन आशीर्वाद घेतला म्हणूनच त्यांनी ग्रंथाच्या प्रारंभी “ओम नमोजी आद्या ,”अशी सुरुवात करत शिवा ची आराधना केली. नाथ संप्रदायाची सुरुवात आदिनाथ म्हणजे वृद्धेश्वरपासून तर त्याचे शेवटचे टोक वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वरांपर्यंत मानले जाते. नाथ संप्रदायाची विस्तारित शाखा म्हणून आजचा वारकरी संप्रदाय ओळखला जातो.