जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार जगवा ; अन्यथा पिझ्झाप्रमाणे भाकरीही ऑनलाईन ऑर्डर करावी लागेल ?

Published on -

अहिल्यानगर : शेतकरी म्हणजे कष्टाने माळरानात धान्य पिकवून जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार! मात्र, त्याची व्यथा व त्याचे कष्ट शेतकऱ्याच्या घरी जन्माला आल्याशिवाय समजत नाहीत. प्रॉपर्टी नव्हे तर जीव गहाण ठेवून केला जाणारा व्यवसाय म्हणजे शेती ! कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस असो वा ओल्याचिंब धारा. अशावेळीदेखील आपला हा सर्जा राजा शेतात राबत असतो. कधी अवकाळी पाऊस तो अन शेतीला वाहून नेतो तर कधी आकाशातून पावसाचा थेंबही पडत नाही. अशा वेळी शेतकरी पावसाची वाट पाहून थकतो.

शेती व्यवसाय म्हटलं की लोक लगेच नको म्हणतात. अगदी शेतकरी आई-वडीलदेखील आपल्या मुलाला शेती करू नका, असं सांगत असतात. शेतीमालाला न मिळणारा भाव, औषधांचा खर्च, दुष्काळ, अवेळी पडणारा पाऊस, निसर्गाचा लहरीपणा, या सारख्या समस्यांमुळे शेती करायला सध्याची तरुणाई तयार होत नाही.

शेतकरी हा जगाचा अन्नदाता असून, तोच देशाचा खरा भाग्यविधाता आहे. ज्या दिवशी भाकरी पिझ्झाप्रमाणे ऑर्डर करावी लागेल, त्या दिवशो या देशाला शेतकऱ्याची किंमत कळेल. कारण बळीराजा हा इमानी असून, तो कष्टाने पीकपाणी पिकवतो. उन्हातान्हात शेतात घाम गाळून राब राब राबतो, कडाक्याच्या थंडीतही रात्रभर जागतो. पावसाळ्यातसुद्धा मेघगर्जनेसह ओल्याचिंब बरसणाऱ्या पावसाच्या सरी डोक्यावर झेलतो. शेतात नांगर चालवतो तेव्हाच देश चालतो. जर त्याने शेतात अन्नधान्य पिकविले तरच देशात सुख समृद्धी नांदेल.

शेतकरी बळकट असला तरच घरोघरी उन्नती होईल. तो धरणीला आई मानून शेतात राबत असतो. स्वतःचं घर गळणारं असूनही जो जीव तोडून पावसाची वाट बघत असतो. सर्व संकटावर मात करून शेतकरी शेतात दिवसरात राबत असतो. देश डिजिटल झाला तरी भाकरी ऑनलाईन येत नाही. शेतकरी जगवतो देशाला तरी श्रेय मात्र तो घेत नाही. जगाचा हा पोशिंदा शेतात राबून पशु, पक्षी,मनुष्याची भूक भागवत असतो. त्याच्या मालाला कवडीमोल भाव मिळत असूनही तो घाम गाळून धान्य पिकवत असतो. आपल्याला चांगले दिवस येतील, या आशेवर आजही तो जगत आहे.

प्रत्येक वेळी निराशा होऊन तो स्वतःच्याच नजरेत खचत आहे. दुनियेसाठी मरमर मरूनदेखील त्याच्या पदरी साध सुख सुद्धा पडत नाही. कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात नुकसानीची फक्त पाहणी होते. पिकाच्या भरवशावर काढलेले कर्ज फेडायचे कसे, याचीच चिंता बळीराजाला सतावत असते. सत्ता कोणत्याही पक्षाची असू द्यात शेतकर्‍याची व्यथा हीच असते. शेतकर्‍याची खरी कळकळ नेहमी विरोधी पक्षालाच असते. संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याला ओळखल जाते. शेतकरी काबाड कष्ट करून शेतात धान्य पिकवतात म्हणून आपण आपल्या घरात सुखाचे घास खाऊ शकतो. भारतात बहुतांश लोकसंख्या ही ग्रामीण भागातील असून, भारताचा मुख्य व्यवसाय शेती आहे. सहाजिकच भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकरी बांधवांचा खूप मोठा वाटा आहे.

शेतकरी निसर्गाचा खरा मित्र आहे. कारण त्याचे जमिनीशी असलेले नाते हे मूल व आई प्रमाणे असते. आजही आपल्या देशात शेतकरी जमिनील आईचा दर्जा देतो व मेहनत करून तिच्यातून धान्य पिकवतो, त्यामुळे खऱ्या अर्थाने तो जगाचा पोशिंदा आहे. मात्र, असे असूनही आपल्या देशात शेतकऱ्याची अवस्था दयनिय आहे. जगाला आपल्या कष्टाने ‘पोसणाऱ्या शेतकऱ्यावरच आत्महत्या करण्याची वेळ येते, तेव्हा मन गलबलून जाते.

शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, भारतातील बहुतांश लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. भारतीय लोक शेतातविविध प्रकारचे प्रयोग करतात, शेती ही मानवाची प्राचीन संस्क्‌ती आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा असून, शेती हा संपूर्ण राष्ट्राचा पाया आहे. शेती ही मान्सूनवर अवलंबून असून, मान्सून हा भारतीय शेतीतील प्रमुख घटक आहे. मान्सून जर वेळेवर झाला तर शेती व्यवास्थित होते, त्यामुळे पिकावरील रोगराई धुवून जाते. पिकाची वाढ अतिशय जोमदार होते. परंतु, कधी कधी निसर्गाचा लहरी पणाही शेतकऱ्याला घातक ठरतो.

काही वेळेला अतिवृष्टी होते, सगळे पीक कुजून जाते, काही वेळा पुरात वाहून जाते. झाडाला लागलेली फळे गळून जातात, खराब होतात. कधी अवर्षण होते, पेरलेल बी फुकट जाते, काहीच उगवत नाही.काही वेळा बी बियाणांत भेसळ असते, त्यामुळे मेहनत वाया जाते. शेतकरी त्याचे पीक अनेक नैसर्गिक आपत्तीपासून वाचवतो. पशुपक्षी, किडे, मुंग्या आदीपासून तो आपल्या पिकाचे रक्षण करतो. शेतात सुंदर बहरलेल्या पिकामागे शेतकऱ्याची शेतीविषयीचे प्रेम व कठीण परिश्रम असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!