सराफाकडून लाच घेताना पोलीस अधिकारी रंगेहाथ जाळ्यात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-एका चोरीच्या गुन्ह्यातील सोने नाशिकच्या सराफाने विकत घेतल्याच्या संशयाने तपास सुरू असताना संबंधित सोनाराकडे दोन लाखांची लाच मागितल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

यातील एक लाख रक्कम स्विकारताना संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक राणा प्रतापसिंह परदेशी यांना लाचलुचपत शाखेने संगमनेरातच रंगेहात पकडले आहे.

ही कारवाई मंगळवार दि. 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास झाली. गेल्या महिन्यात संगमनेर तालुक्यात घरफोडी झाली होती. मुलांनीच आपल्या घरातून दागिन्यांची चोरी केली होती.

घरातून सुमारे सव्वा दोन लाखांचे दागिने चोरले. ते दागिने नाशिकच्या सराफाला विकले. आपले वडील आजारी असल्याने पैशांची गरज आहे, असे कारण सांगून त्यांनी दागिने विकले.

त्या पैशांतून गोव्यात जाऊन मौजमजा केली. या प्रकरणाचा तपास परदेशी यांच्याकडे होता. त्यांनी आरोपींच्या मोबाइल नंबरच्या आधारे तांत्रिक पद्धतीने तपास केल्यावर आरोपी गोव्यात असल्याचे समजले.

त्यानुसार परदेशी यांनी पथकासह जाऊन आरोपींना अटक केली. चौकशीत त्यांनी ज्याला सोने विकले, त्या नाशिकमधील सराफाचे नाव सांगितले होते. त्यामुळे सराफाला या गुन्ह्यात आरोपी करण्याचा धाक दाखवून तब्बल दोन लाखांची लाच मागण्यात आली होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment