काँग्रेस १११ तर राष्ट्रवादी १०४ जागा लढण्याची शक्यता

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी दुपारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली.

महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटपाला अंतिम स्वरूप देण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. राज्यात आघाडीची अधिकृत घोषणा करण्याविषयीसुद्धा पवार व सोनिया यांच्यात खलबते झाल्याचे बोलले जात आहे.

राज्यात आघाडीला उतरती कळा लागली आहे. त्यातच विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, शरद पवार यांनी ‘१० जनपथ’वर जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली.

साधारणत: ४५ मिनिटे दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रातील राजकीय मुद्यांवर बातचित केली. लागोपाठ नेते सोडचिठ्ठी देत असतानाही भाजप-शिवसेनेचे आव्हान कसे पेलायचे? यावरही काथ्याकूट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे नवे राजकीय हातखंडे अमलात आणत विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला धोबीपछाड देण्याचा शरद पवारांचा दृढ इरादा दिसत आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेत विस्तृत चर्चा केल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ पैकी २१५ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीत मतैक्य झाले आहे. यात काँग्रेस १११ तर राष्ट्रवादी १०४ जागा लढण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment