कोरोनावर विजय मिळविण्याच्या दिशेने देश अग्रेसर – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  जर्मनी, फ्रान्स यांसह काही देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून काही भागात नव्याने लॉकडाऊन जाहीर झाले आहे.

मात्र डॉक्टर्स, नर्सेस, समाजसेवी संस्था, संशोधक व सेवाभावी व्यक्ती यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे भारत कोरोनावर विजय मिळविण्याच्या दिशेने सातत्याने वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

धारावी तसेच इतरत्र कोरोना प्रकोपाच्या काळात समाजकार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला,

भामला फाउंडेशन संस्थेच्या वतीने कोरोना योद्ध्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सेवा हा शब्द उच्चारण्यास अतिशय सोपा आहे; परंतु सेवा करणे अतिशय कठीण आहे.

मात्र भारतातील डॉक्टर्स, परिचारिका व इतर समाजसेवकांनी कोरोना काळात आपण प्रत्यक्ष भगवंताची सेवा करीत आहोत या भावनेने कार्य केल्याचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

‘धारावी कोरोना नियंत्रण : लोकसहभागाचे उदाहरण’

धारावी येथील कोरोनाची बिकट स्थिती सामूहिक प्रयत्नांतून नियंत्रणात आणल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

शासन कार्यासोबतच लोकसहभाग तसेच अशासकीय संस्थांचे योगदान यामुळे धारावी येथील कोरोना संसर्ग नियंत्रित करणे शक्य झाले असे दिघावकर यांनी यावेळी सांगितले.

उदयपुरचे युवराज लक्ष्यराज सिंह मेवाड, बांधकाम व्यावसायिक तसेच शिक्षणसंस्था चालक निरंजन हिरानंदानी, पार्श्वगायक शान व गायिका पलक मुच्छल, अभिनेते अलि फजल व भामला फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला यावेळी उपस्थित होते.

नानावटी रुग्णालयाचे डॉ. समद अन्सारी, हिरानंदानी रुग्णालयाचे मुख्याधिकारी डॉ सुजित चटर्जी, विजय कारिया, सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी,

कमल खुशलानी, विनीत गौतम, त्रिवनकुमार कर्नानी, रोमांचक अरोरा, निक्सन जोसफ, नेल्सन कोएल्हो, बैद्यनाथचे आयुर्वेदचे अध्यक्ष सिद्धेश शर्मा,

आर डी नॅशनल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. नेहा जगतियानी, समाजसेवी एहसान गडावाला, अनुराग कत्रियार, धारावी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश नागरे यांचा कोरोना काळातील कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment