Shetkari Karjmafi 2025 : गत काही दिवसांपासून राज्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी पुरस्थिती तयार झाली आहे. खान्देश, मराठवाडा अन सोलापूर मध्ये परिस्थिती बिकट बनलीये. काल नाशिक अन अहिल्यानगर मध्ये सुद्धा पावसाचे तांडव पाहायला मिळाले.
यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. खरीपातील पिकांची पार राखरांगोळी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून भरीव मदतीची मागणी केली जात आहे. तसेच शेतकरी कर्जमाफीची पण मागणी उपस्थित केली जात आहे.

सरकारकडून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. पण सरकारने जाहीर केलेली मदत फारच तुटपुंजी असून शेतकऱ्यांमध्ये या विरोधात नाराजी पाहायला मिळत आहे.
खरेतर गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकरी कर्जमाफी दिली जाईल अशी आश्वासन दिले होते. यामुळे आता शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरत असून यासाठी विरोधकांकडूनही सरकारला धारेवर धरले जात आहे.
शेतकरी संघटना देखील कर्जमाफीची आग्रही मागणी करताना दिसत आहेत. दरम्यान आता शेतकरी कर्जमाफी बाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे अपडेट दिले आहे.
खरंतर सीएम फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले होते. राजधानीत त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद सुद्धा साधला. माध्यमांसोबत संवाद साधताना त्यांनी कर्जमाफी बाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी संदर्भात आम्ही घोषणापत्रात आश्वासन दिलेले आहे. यामुळे आम्ही त्याची पूर्तता करणार आहोत. पण, शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकारकडून अभ्यास सुरू आहे.
कर्जमाफी नेमकी कधी व कशी करायची याबाबत आमच्या समितीकडून अभ्यास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकरी कर्जमाफी वारंवार करता येणार नाही.
त्यामुळे शेतकरी कर्जमाफी करतांना ती परिमाणकारक होणे सुद्धा आवश्यक आहे. सध्याची स्थिती पाहता शेतकऱ्यांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पोहोचवणे हे महत्वाचे आहे.
तसेच खरीपासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड शेतकऱ्यांना पुढील वर्षी करावी लागणार अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून शेतकऱ्यांना लगेचच कर्जमाफीची भेट मिळणार नसल्याचे स्पष्ट होते.
परंतु येत्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भात सरकारकडून योग्य तो निर्णय होईल अशी आशा आहे. यामुळे आता हिवाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारने समितीची स्थापना केली आहे यामुळे जोपर्यंत या समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत तरी कर्जमाफी बाबत कोणताच अंतिम निर्णय होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.