Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये देशात अनेक महत्त्वाच्या महामार्गाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही समृद्धी सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पामुळे मराठवाडा विदर्भ सहीत राज्यातील अनेक मागास भागांमधील विकासाला चालना मिळाली आहे.
अशातच आता केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. खरेतर पुणे–छत्रपती संभाजीनगर असा द्रुतगती महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. पण आता या महामार्गाचा आणखी विस्तार होणार आहे. हा प्रकल्प जालना शहरापर्यंत वाढविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः हे आश्वासन दिले आहे. यामुळे जालना व आजूबाजूच्या परिसराच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच रखडलेल्या ड्रायपोर्ट प्रकल्पाला गती देऊन लवकरच काम पूर्ण करण्याचे निर्देशही गडकरी यांच्याकडून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
खरे तर तीन-चार दिवसांपूर्वी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली होती. या बैठकीत आमदारांनी विविध मागण्यांचे निवेदन मंत्रिमहोदयांकडे सादर केले.
या चर्चेला जालन्यातील उद्योजक नंदकिशोर जेथलिया सुद्धा उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी सांगितले की, पुणे–छत्रपती संभाजीनगर महामार्ग जालना शहरापर्यंत वाढविण्यात येईल तसेच समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज पॉईंटला जोडण्यात येईल.
ड्रायपोर्टचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी निर्देश दिले असून, विलंब करणाऱ्या संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जालना शहरातील दोन प्रमुख रस्त्यांनाही निधीसह मंजुरी देण्याची ग्वाही गडकरी यांनी दिली.
भोकरदन नाका ते ढवळेश्वर मार्गे भोकरदन चौफुलीपर्यंतचा रस्ता आणि राजमाता जिजाऊ चौक ते नाव्हा चौफुलीपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब स्थितीत आहे. या दोन्ही रस्त्यांच्या दुरुस्ती व विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
या निर्णयांमुळे जालना परिसरातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून, नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाचा लाभ होणार आहे. या मंजुऱ्या आणि आश्वासनांमुळे जालनेकरांसाठी ही दिवाळी विशेष ठरणार आहे.