Maharashtra Government Employee News : सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता दिवाळी बोनसची आतुरता लागली आहे. खरे तर गेल्या काही दिवसांमध्ये काही कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम मिळाली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे 78 दिवसांचा बोनस नुकताच वितरित करण्यात आला आहे.
याशिवाय दिवाळीच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आलाय. इतरही राज्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढलाय. अशातच आता राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या आधी तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. राज्यातील 85 हजार एसटी कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना यावर्षी 6000 रुपये दिवाळी भेट देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संबंधित कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणून सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना सण अग्रीम म्हणून 12500 रुपये दिले जातील. एवढेच नाही तर वेतन वाढीचा फरक सुद्धा दिला जाणार आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची सह्याद्री गृहात काल एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे.
या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य सरकारने त्यांना एकूण तीन आर्थिक लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा माहिती दिली आहे.
सरनाईक यांनी सांगितल्याप्रमाणे एस टी महामंडळ अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6 हजार रुपये देण्यासाठी शासनाने सुमारे 51 कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे.
तसेच सन 2020-24 दरम्यानच्या वेतनवाढ फरकाची रक्कम सुद्धा कर्मचाऱ्यांना दरमहावेतना सोबत देण्यात येणार असून यासाठी शासनाने 65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबरोबरच जे पात्र कर्मचारी सण अग्रीम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे 12 हजार 500 रुपये देण्यात येणार आहेत.
यासाठी शासनाकडे 54 कोटी रुपयांची मागणी एस टी महामंडळाकडून करण्यात आली असून लवकरच ही मागणी पूर्ण होणार आहे. नक्कीच राज्य शासनाचे हे निर्णय एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे ठरणार आहेत.