EPFO News : संघटित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट असते. दरम्यान जर तुमचेही पीएफ अकाउंट असेल तर तुमच्यासाठी ईपीएफओ कडून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ईपीएफओ ने आपल्या सात कोटी सदस्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
13 ऑक्टोबर रोजी ईपीएफओची महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे तर काही नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. बैठकीत झालेल्या या निर्णयामुळे ईपीएफओ च्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.

दरम्यान आता आपण या बैठकीत नेमके कोणते निर्णय घेण्यात आले आहेत आणि या निर्णयांचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या नियमांमध्ये मिळाली शिथिलता
कर्मचाऱ्यांना आता आंशिक पैसे काढण्याच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या ईपीएफओ खात्यातील कर्मचारी तसेच नियोक्ता योगदानाच्या शंभर टक्क्यांपर्यंत रक्कम आंशिक स्वरूपात काढता येईल.
तसेच आता आंशिक पैसे काढण्यासाठी आवश्यक असणारा सेवा कालावधी सुद्धा बारा महिने करण्यात आला आहे. आता गरजेच्या वेळी पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. शैक्षणिक खर्चासाठी आता कर्मचाऱ्यांना दहा वेळा पैसे काढता येतील.
लग्नाच्या खर्चासाठी पाच वेळा पैसे काढता येतील. आधी लग्नासाठी तसेच शिक्षणासाठी फक्त तीन वेळा पैसे काढता येत होते. याशिवाय नैसर्गिक आपत्ती किंवा महामारीसारख्या परिस्थितीत कारणे सांगण्याची गरज उरलेली नाही. यामुळे क्लेम लवकर निकाली निघू शकतो.
हे नियम झालेत कठोर
ईपीएफओ ने काही नियम शिथिल केले आहेत तर काही नियम कठोर केले आहेत. नोकरी गमावल्यानंतर जर कर्मचाऱ्याला मॅच्युरिटीच्या आधी पैसे काढायचे असतील तर त्याला आता बारा महिने थांबावे लागणार आहे.
तसेच पूर्ण पेन्शन काढायची असल्यास कर्मचाऱ्याला आता 36 महिने थांबावे लागणार आहे. आधी दोन्ही कामांसाठी फक्त दोन महिने वाट पाहावी लागत होती. याव्यतिरिक्त आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या योगदानाच्या रकमेपैकी 25% रक्कम नेहमी त्यांच्या ईपीएफ खात्यात ठेवावी लागणार आहे.