Gold Rate News : सोने तसेच चांदीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरे तर गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. सोन्याचा सध्याचा भाव हा एक लाख तीस हजार रुपये प्रति तोळा आहे.
त्यामुळे साहजिकच नव्याने सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांच्या पुढे आता गुंतवणूक करावी की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय. दरम्यान आज आपण ज्या लोकांना सोन्यात गुंतवणूक करायची असेल आणि पुढील वर्षापर्यंत सोने किती रुपयांपर्यंत वाढू शकते असा प्रश्न असेल त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. 2026 मध्ये सोन्याला आणि चांदीला किती दर मिळू शकतो या संदर्भात तज्ञांकडून काय माहिती दिली जात आहे? याबाबतचा आढावा घेऊयात.

सोन्याचा भाव हा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे पण तरीही सोन्यातील गुंतवणूक सुरूच आहे. मागील पाच वर्षांच्या काळात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 200% रिटर्न मिळाले आहेत. 2020 मध्ये सोन्याची किंमत 47 हजार रुपये प्रति तोळा अशी होती. पण आता सोन्याची किंमत एक लाख तीस हजार रुपये प्रति तोळा झाली आहे.
दरम्यान, जागतिक स्तरावरील एचएसबीसी आणि बँक ऑफ अमेरिका यांसारख्या बँकांनी पुढील वर्षी सोन्याची किंमत पाच हजार डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचू शकते असा अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच भारतात सोन्याची किंमत 1.50 ते 1.60 लाख प्रति तोळा होईल असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. यावरून सोन्याच्या किमती पुढील वर्षी सुद्धा तेजीतच राहणार असे स्पष्ट होत आहे.
तसेच मोतीलाल ओसवालने 2026 मध्ये चांदीच्या किमती 47 टक्क्यांपर्यंत वाढतील असा अंदाज वर्तवला आहे. जागतिक पातळीवर कमी होत असलेला पुरवठा आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये चांदीचा वाढणारा वापर यामुळे याची किंमत 2.4 लाख रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पुढील काळ देखील फायद्याचा ठरणार असे या अंदाजावरून स्पष्ट झाले आहे.