लखनौ : लखनौमध्ये जर तुम्ही बरमुडा, शॉर्ट्स अथवा लुंगी घालून गाडी चालवली तर तुम्हाला चारपट दंड भरावा लागेल. यासंदर्भात वाहतूक पोलीस अधीक्षकांनी नवीन फर्मान काढले आहे.
याअंतर्गत मोठे आणि जड वाहन चालवताना जर वाहतूक ॲक्टच्या नियमानुसार कपडे घातले नाहीत, तर नवीन दराने दंड वसूल केला जाणार आहे. वाहतूक पोलीस अधीक्षक म्हणाले की, गाडी चालवणाऱ्यांसाठी विशेष करून ड्रेस कोड असेल. या ड्रेस कोडमध्ये पॅंट, शर्ट आणि बुटाचा समावेश आहे.
वाहन चालवताना कुठल्याही प्रकारची लुंगी अथवा अन्य ड्रेस घातल्यास २ हजार रुपये दंड भरावा लागेल. देशात नवीन मोटर वाहन नियम लागू झाला आहे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंडा करण्यात येत आहे. मोठ्या दंडामुळे नागरिक हैराण झाले असून सोशल मीडियावर याप्रकरणी कठोर शब्दांत टीका केली जात आहे.
यादरम्यान, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, आपण कायद्याचा सन्मान केला पाहिजे आणि कायद्याची भीती कायम राहिली पाहिजे. गडकरी म्हणाले की, जर वाहतूक नियमांचे पालन न केल्याने अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? अशा प्रकारे दंड वाढवण्याची सरकारची इच्छा नव्हती.
विशेष बाब म्हणजे एक वेळ अशी यावी की, येथे अशा प्रकारचा कुठलाच दंड नसावा आणि प्रत्येक जण नियमांचे पालन करेल.