मुंबई : कामोठे सेक्टर ३४ येथे राहणाऱ्या विवाहितेची आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलाची मोठ्या दिराने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. सुरेश चव्हाण असे दिराचे नाव आहे. कामोठे पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
चव्हाण हा काहीच काम करत नसल्याने त्याला कुटुंबीयांनी वर्षभरापूर्वी घरातून बाहेर काढले होते. या रागातून त्याने हे हत्याकांड केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.. या घटनेत हत्या करण्यात आलेल्यांमध्ये जयश्री चव्हाण (२२) व तिचा मुलगा अविनाश चव्हाण (२) या दोघांचा समावेश आहे.
यातील मृत जयश्री ही मुलगा अविनाश, पती योगेश चव्हाण आणि सासू-सासऱ्यांसह कामोठे सेक्टर ३४ मध्ये राहतात. सुरेश चव्हाण जयश्रीचा मोठा दीर असून तोसुद्धा पूर्वी यांच्यासोबत राहत होता. मात्र तो काहीएक व्यवसाय करत नसल्याने त्याला त्याच्या कुटुंबीयांनी वर्षभरापूर्वी घरातून बाहेर काढले होते. लहान भावाची पत्नी जयश्री घरात आल्यानंतर तिच्या सांगण्यावरून आपल्याला आई-वडिलांनी व भावाने घरातून बाहेर काढल्याचा राग सुरेशच्या मनात होता.
गणपतीनिमित्त नुकतेच सुरेशचे आई-वडील गावी गेले होते. त्यामुळे कामोठे येथील घरात लहान भाऊ योगेश, त्याची पत्नी जयश्री व त्यांचा मुलगा अविनाश हे तिघेच होते. सोमवारी लहान भाऊ योगेश हा कामावर गेल्यानंतर घरात जयश्री व तिचा मुलगा अविनाश हे दोघेच होते. ही संधी साधून सायंकाळी सुरेश कामोठे येथील घरी गेला होता.
या वेळी त्याने जयश्रीसोबत त्याला घराबाहेर काढल्याच्या रागातून वाद घालून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र जयश्रीने त्याला विरोध केल्याने सुरेशने रागाच्या भरात जयश्री व पुतण्या अविनाश या दोघांचा गळा आवळून हत्या केली.
दोघांची हत्या केल्यानंतर सुरेश चव्हाण हा जयश्री व अविनाश या दोघांच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला.. रात्री १० च्या सुमारास योगेश कामावरून घरी आल्यानंतर घरात पत्नी जयश्री व मुलगा अविनाश हे दोघे मृतावस्थेत पडल्याचे त्याच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले.