अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुटखा तस्करीचे प्रकरण चांगलेच गाजू लागले आहे. वाढत्या घटनांना रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील आक्रमक कारवाई करत आहे.
यातच नगर जिल्ह्यात घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या एकलहरे येथील गुटखा छापा प्रकरणात शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या पथकाने काल उशिरा श्रीरामपूर एस.टी. डेपोचे निवृत्त अधिकारी अन्सार आजम शेख व अरुण गांगुर्डे यांना ताब्यात घेतले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रातील आठवाडी शिवारात गुलाबाच्या बागेलगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 54 लाखांचा गुटखा साठा जप्त केला त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनंतर याच भागातील एका बंद खोलीतून 11 लाख 66 हजारांचा गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केली.
परिसरात दोन वेगवेगळे छापे पडले पहिल्या ठिकाणी जो अवैध गुटखा सापडला त्या ठिकाणच्या मालकाचा शोध पोलीस यंत्रणेला एका आठवड्यानंतर लागला तर दुसर्या छापा ठिकाणच्या मालकाचा शोध अर्धा महिना लोटूनही लागत नव्हता मात्र काल पोलिसांनी अन्सार आजम शेख व अरुण गांगुर्डे या दोघांना ताब्यात घेतले आहे.
या गुटख्याच्या अवैध व्यवसायात तीन प्रमुख भागीदार असल्याचे बोलले जात आहे, हे तिघे अनुक्रमे बेलापूर, एकलहरे व संगमनेरचे आहे. तपासात पहिल्या छापा ठिकाणचा मालक अरुण गांगुर्डे याने गुटखा प्रकरणात अटक झालेल्या करीम आजम शेखला बॉण्डवर
आपली शेती कसण्यासाठी दिल्याचे प्रथमतः तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या तपासात उघड झाले होते. मात्र या तपास कामात बहिरट संशयाच्या भोवर्यात सापडल्याने शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्याकडे गुटखा प्रकरणाचा तपास देण्यात आला.
पुढे तपासात गांगुर्डे याने करीम आजम शेखला शेती कसण्यासाठी दिलेल्या बॉण्डवर खाडाखोड असल्याचे निदर्शनास आल्याने संजय सातव यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved