अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- देशभरात करोनाचा प्रादुर्भाव घटत असल्याचे आशादायी चित्र असतानाच कोव्हिड-१९च्या संसर्गात पुन्हा वाढ होताना दिसत आहे.
राजधानी दिल्लीत करोनाची तिसरी लाट आली असल्याचे संकेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी दिले होते. यातच मागील २४ तासांत ५० हजार २१० नव्या करोनारुग्णांची नोंद होऊन देशातील एकूण रुग्णसंख्या ८३ लाख ६४ हजार ८६वर पोहोचली आहे.
गेल्या २४ तासांत ७०४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू होऊन मृतांची संख्या एक लाख २४ हजार ३१५ झाली आहे. देशातील करोनामृत्यूचे प्रमाण १.४९ टक्के असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशात आत्तापर्यंत ७७ लाख ११ हजार ८०९ रुग्णांनी करोनावर मात केली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२० टक्क्यांवर आले आहे.
सध्या पाच लाख २७ हजार ९६२ रुग्ण उपचाराधिन असून, ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ६.३१ टक्के आहे. ‘आयसीएमआर’च्या नोंदीनुसार बुधवारी १२ लाख नऊ हजार ४२५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून, ४ नोव्हेंबरपर्यंत ११ कोटी ४२ लाख आठ हजार ३८४ नमुने तपासण्यात आले आहेत.
देशात ७ ऑगस्टला रुग्णसंख्येने २० लाख, २३ ऑगस्टला ३० लाख आणि ५ सप्टेंबरला ४० लाखांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर १६ सप्टेंबरला ५० लाख, २६ सप्टेंबरला ६० लाख, ११ ऑक्टोबरला ७० लाख आणि २९ ऑक्टोबरला ८० लाखांचा टप्पा ओलांडला गेला.
मागील २४ तासांत नोंदवल्या गेलेल्या ७०४ मृत्यूंमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक तीनशे, पश्चिम बंगाल ५५, दिल्ली ५१, छत्तीसगड ५०, कर्नाटक ३४, तामिळनाडू ३० आणि केरळातील २८ मृत्यूंचा समावेश आहे. एकूण एक लाख २४ हजार ३१५ मृत्यूंमध्ये महाराष्ट्रातील ४४ हजार ५४८ मृत्यूंचा समावेश आहे.
हमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved