Post Office Scheme : रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने गेल्या काही महिन्यांपासून रेपो रेट कपातीचा सपाटा लावलाय. आरबीआय कडून रेपो रेटमध्ये सातत्याने कपात केली जात असल्याने देशभरातील खाजगी आणि सरकारी बँका फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी करत आहेत. यामुळे एफ डी मध्ये गुंतवणूक करणे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना परवडत नाही आणि म्हणूनच अनेक जण आता पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे आता केंद्र शासनाने सरकारी बचत योजनांचे व्याजदर सुद्धा जाहीर केले आहे.
केंद्र शासनाने 31 डिसेंबर 2025 रोजी जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीसाठी बचत योजनांचे व्याजदर जाहीर केले आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या सर्वच लघुबचत योजनांचे व्याजदर शासनाकडून जाहीर करण्यात आले असून या जेवढ्या पण लघु बचत योजना आहेत त्या सर्व बचत योजना पोस्ट ऑफिस कडून चालवल्या जातात. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसकडून व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या सर्वच लघुबचत योजनांचे व्याजदर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) : ही एक सरकारी बचत योजना आहे. या बचत योजनेसाठी चे नवीन व्याजदर सरकारने 31 डिसेंबर रोजी जाहीर केले आहे. या बचत योजनेत फक्त महिलांना गुंतवणूक करता येते आणि ही बचत योजना पोस्ट ऑफिस तसेच काही निवडक राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना नवीन 7.5% दराने व्याज दिले जाणार आहे. या योजनेचे व्याजदर आधी पण हेच होते. म्हणजेच आरबीआयच्या रेपो रेट कपातीचा या योजनेतील गुंतवणूकदारांवर कोणताच परिणाम होणार नाहीये.
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट : राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही देखील एक सरकारी योजना आहे आणि यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आयकर कायद्याअंतर्गत कर सवलत सुद्धा उपलब्ध करून दिली जाते. या योजनेसाठीचे नवीन व्याजदर 7.7% ठरवण्यात आले आहे.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना : ही पोस्ट ऑफिसची एक लोकप्रिय लघु बचत योजना असून या बचत योजनेला केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाकडून मान्यता प्राप्त आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.4% दराने व्याज दिले जाते आणि हे व्याज प्रत्येक महिन्याला संबंधित गुंतवणूकदारांच्या बचत खात्यात वर्ग केले जाते.
सुकन्या समृद्धी योजना : ही योजना खास मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला जर तुमच्या मुलींच्या नावाने गुंतवणूक करायची असेल तर सुकन्या समृद्धी योजना ही योजना तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे. यात दहा वर्षांखालील मुलींच्या नावाने अकाउंट ओपन करता येते. यात 8.2% दराने व्याज दिले जात आहे.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना : सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी बचत योजना आहे. या योजनेत 60 वर्षांवरील नागरिकांना गुंतवणूक करता येते. जे व्हीआरएस घेतात त्यांना 55 व्या वर्षापासून गुंतवणूक करता येऊ शकतो. सैन्यात असणाऱ्यांना 50 व्या वर्षाच्या पुढे सुद्धा गुंतवणूक करता येऊ शकते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 8.2% दराने व्याज दिले जाते. योजनेची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी जवळील पोस्ट ऑफिसच्या शाखेला भेट देणे आवश्यक आहे.













