गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी ! चांदीची किंमत मोठ्या प्रमाणात घसरणार, दिग्गज गुंतवणूकदार कियोसाकी यांचा दावा

Published on -

Silver Price : चांदीच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच प्रसिद्ध लेखक आणि गुंतवणूक तज्ज्ञ रॉबर्ट कियोसाकी यांनी चांदीतील गुंतवणुकीबाबत मोठा इशारा दिला आहे.

“रिच डॅड पुअर डॅड” या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक असलेल्या कियोसाकी यांनी चांदीचे दर सध्या उच्चांकाच्या जवळ असल्याचे सांगत गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी, असे मत व्यक्त केले आहे.

कियोसाकी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, “कदाचित चांदीचे दर आता आपल्या पीकवर पोहोचले असावेत. यात पुढील काळात आणखी तेजी येण्यापूर्वी मोठी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर सुमारे ८५ डॉलर्स प्रति औंसच्या आसपास व्यवहार करत आहे. मात्र, “मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. चांदी १०० डॉलर्सपर्यंत खरेदी करत राहीन आणि योग्य वेळेची वाट पाहीन,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

चांदीचे दर घसरल्यास घाईघाईने निर्णय न घेता संयम ठेवण्याचा सल्ला देत कियोसाकी म्हणाले की, “बाजारात स्पष्ट संकेत मिळेपर्यंत थांबणे आवश्यक आहे.”

त्यांनी त्यांच्या गुंतवणूक प्रवासाचा उल्लेख करत सांगितले की, १९६५ साली त्यांनी पहिल्यांदा चांदी अवघ्या १ डॉलर प्रति औंस दराने खरेदी केली होती. १९९० च्या दशकात तीच चांदी ४ ते ५ डॉलर्सपर्यंत पोहोचली आणि तेव्हापासून ते चांदीचे कट्टर समर्थक बनले.

दरम्यान, चांदी विकणाऱ्या गुंतवणूकदारांनाही कियोसाकी यांनी खास संदेश दिला आहे. सध्या किंमत वाढल्याने अनेक छोटे गुंतवणूकदार नफा मिळवण्यासाठी चांदी विकत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यामुळे बाजारात तात्पुरती घसरण होऊ शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तसेच, आपण भविष्यात चांदीचे रुपांतर सोन्यात करण्याचा विचार करत असल्याचेही त्यांनी संकेत दिले.

१२ जानेवारी रोजी कियोसाकी यांनी “चांदी खरेदी करायला उशीर झाला आहे का?” या प्रश्नाला “नाही” असे उत्तर दिले होते.

भू-राजकीय तणाव, महागाई आणि आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळत असल्याने चांदीकडे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ओढा वाढताना दिसत आहे.

दरम्यान, देशांतर्गत बाजारातही चांदीने उच्चांकी पातळी गाठली आहे. मंगळवारी सायंकाळी ४ वाजता चांदी प्रति किलो २,७०,१०१ रुपयांवर व्यवहार करत होती.

यामध्ये १,१३१ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. वाढत्या दरांमुळे चांदी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe