Agro News : सोयाबीन उत्पादकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. यंदा केंद्र सरकारने या पिकासाठी ५,३२८ रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केलाय.
पण खुल्या बाजारात नवीन हंगाम सुरू झाल्यापासून एमएसपीपेक्षा कमी दर मिळतोय. विशेषतः मराठवाड्यातील बाजारपेठांमध्ये दरांवर दबाव कायम आहे.

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?
आता या महिन्यात पिवळ्या सोन्याच्या किमतीत वाढ होणार का हा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होतोय. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या पंधरा दिवसांत सोयाबीनच्या दरांमध्ये फार मोठी तेजी येणार नाही.
लातूर बाजारातील उपलब्ध माहिती आणि मागील ट्रेंड लक्षात घेता, जानेवारी २०२६ मध्ये FAQ (Fair Average Quality) ग्रेडच्या सोयाबीनसाठी ४,३१० ते ४,७५० रुपये प्रति क्विंटल दर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र हे दर अद्यापही MSP पेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.
वर्ष जानेवारी महिन्यातील भाव
२०२३ ५,३९३ रुपये प्रति क्विंटल
२०२४ ४,६५९ रुपये
२०२५ ४,१२५ रुपये प्रति क्विंटल
बाजार अभ्यासकांनी मागील वर्षांच्या तुलनेत यंदा जानेवारीमध्ये दर काहीसे सुधारतील, पण ते मर्यादित पातळीवरच राहतील, असा अंदाज दिला आहे.
दुसरीकडे यंदा फक्त १०५ लाख टन उत्पादन होणार असा अंदाज आहे. हे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १७ टक्क्यांनी कमी असले तरी, सध्या असलेला साठा आणि मंद निर्यात यामुळे बाजारभावांना तात्काळ आधार मिळताना दिसत नाही.
एकूणच, जानेवारीच्या उर्वरित कालावधीत सोयाबीनच्या दरांमध्ये मर्यादित चढउतार होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी बाजारातील हालचाली लक्षात घेऊनच विक्रीचे निर्णय घ्यावेत, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून दिला जात आहे.













