SBI Saving Scheme : महागाईच्या वाढत्या काळात घरखर्च, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजा यासाठी होणारा खर्च सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेकांना बचत आणि गुंतवणूक करणे कठीण वाटते.
बऱ्याच जणांचा असा समज असतो की मोठी रक्कम जमा करण्यासाठी मोठा पगार किंवा मोठी गुंतवणूक आवश्यक असते. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) ‘हर घर लखपती’ योजना हा समज पूर्णपणे चुकीचा ठरवते.

गुंतवणूकदार बनणार धनवान !
हर घर लखपती ही एक रिकरिंग डिपॉझिट म्हणजे RD योजना आहे. यात दरमहा एक ठराविक रक्कम जमा केली जाते. यात मुदत पूर्ण झाल्यानंतर जमा रक्कम व्याजासह एकरकमी मिळते.
नियमित बचतीची सवय लागावी आणि कमी उत्पन्नातही आर्थिक उद्दिष्टे साध्य करता यावीत, या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेचा कालावधी साधारणपणे ३ ते १० वर्षांपर्यंत असतो.
२० रुपयांची गुंतवणूक बनवणार लखपती
या योजनेतील सर्वात आकर्षक बाब म्हणजे दरमहा फक्त ६१० रुपये जमा करून १० वर्षांत सुमारे १ लाख रुपये जमा करता येतात. म्हणजेच रोज साधारण २० रुपये बाजूला काढले, तरी दीर्घकालीन काळात मोठा निधी उभा राहू शकतो. त्यामुळे नोकरी करणारे कर्मचारी, लघुउद्योग करणारे, गृहिणी तसेच नवखे गुंतवणूकदारांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते.
‘हर घर लखपती’ योजनेवरील व्याजदर गुंतवणुकीच्या कालावधीवर आणि गुंतवणूकदाराच्या श्रेणीवर अवलंबून असतात.
सध्या सामान्य नागरिकांसाठी ३ ते ४ वर्षांच्या कालावधीसाठी सुमारे ६.५५ टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुमारे ७.०५ टक्के व्याज दिले जाते. ५ ते १० वर्षांच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना सुमारे ६.३० टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना सुमारे ६.८० टक्के व्याज मिळू शकते.













