Breaking News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. अखेर मनमाड–इंदूर रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू झालय. या मार्गांवर रुळ टाकण्याच्या कामाला सुरवात झालीये. हा प्रकल्प अनेक वर्षांपासून फक्त कागदावरच होता.
म्हणून हा मार्ग गुंडाळला जाणार की काय ? अशी भीती व्यक्त होत होती. तांत्रिक, आर्थिक अडचणींमुळे हा प्रकल्प मागे पडत राहिला. पण आता या मार्गावर रूळ टाकण्याचे काम सुरू झाले असून महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील संबंधित जिल्ह्यांमध्ये फारच आनंदाचे वातावरण आहे. या प्रकल्पासाठी मागील तीन दशकांपासून पाठपुरावा केला जातो.

मनमाड–इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी सन १९९२ पासून संघर्ष समितीने सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. प्रकल्पाला मान्यता मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने समितीने इंदूर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
त्यानंतर तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि अंतिम सर्वेक्षण अहवाल अनेक वेळा तयार करण्यात आले. सन २००९ मध्ये प्रकल्पाचा खर्च सुमारे एक हजार कोटी रुपये होता, जो नंतर वाढून एक हजार ५०० कोटी रुपयांपर्यंत गेला.
त्या वेळी महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारकडून हिस्सा मागवण्यात आला होता. महाराष्ट्राने आपला हिस्सा दिला, मात्र मध्य प्रदेश सरकारकडून निधी न मिळाल्याने प्रकल्प पुन्हा रखडला.
यानंतर खर्च वाढत जाऊन तो सुमारे आठ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. संपूर्ण प्रकल्प अहवालास मान्यता मिळूनही आर्थिक मंजुरीअभावी काम सुरू होऊ शकले नाही.
या काळात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, आमदार अनिल गोटे, खासदार गजेंद्र पटेल, खासदार शंकर लालवानी, राज्यसभा खासदार सुमेर सोलंकी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला.
संघर्ष समितीचे प्रमुख मनोज मराठे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांची भेट घेऊन सर्व कागदपत्रे सादर केली. आयोग अध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर या प्रकल्पाला तब्बल १८ हजार कोटी रुपयांची संपूर्ण आर्थिक मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्या मनमाड ते इंदूर दरम्यान जमीन संपादन व बांधकामाचे काम सुरू असून, धुळे जिल्ह्यातील बोरविहीर परिसरात सुमारे १२० मीटरपर्यंत प्रत्यक्ष रेल्वे रुळ टाकण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान या मार्गासाठी आवश्यक सर्व जमिनीचे संपादन पूर्ण झाल्यानंतर कामाला आणखी वेग येणार आहे.













