2026 पुणेकरांसाठी ठरणार खास ! मार्च महिन्यात सुरू होणार आणखी एक मेट्रो मार्ग

Published on -

Pune News : या वर्षाचा मार्च महिना पुणेकरांसाठी मोठा आनंदाचा ठरणार आहे. हिंजवडी – शिवाजीनगर (मेट्रो ३) मेट्रो मार्ग मार्च अखेरपर्यंत सुरू होईल. याच्या कामाला आता मोठी गती मिळाली आहे. गुरुवारी सकाळी या मार्गावर यशस्वी तांत्रिक चाचणी सुद्धा घेण्यात आली. येत्या मार्चपर्यंत या मार्गांवर प्रवासी सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. 

कशी झाली ट्रायल?

या मार्गांवर माण डेपो ते पुणे विद्यापीठ चौक या दरम्यान चाचणी घेण्यात आली होती. हा टप्पा मेट्रो प्रकल्पाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. याआधी जुलै २०२५ मध्ये माण डेपो ते पुणे विद्यापीठ आणि ऑगस्ट २०२५ मध्ये माण डेपो ते बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स दरम्यान चाचण्या घेण्यात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या चाचणीत तांत्रिक अडचणी आढळल्या होत्या, मात्र रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) च्या मदतीने त्या तातडीने दूर करण्यात आल्या.

PPP तत्त्वावर विकसित होणारा पुण्यातील पहिला प्रकल्प 

चाचणीदरम्यान सुरक्षेची, तांत्रिक यंत्रणांची सूक्ष्म तपासणी झाली. ट्रॅकची गुणवत्ता, वीजपुरवठा, आपत्कालीन ब्रेक प्रणाली, डब्यांची स्थिरता इत्यादी गोष्टी चेक झाल्यात. २३.३ किलोमीटर लांबीचा मेट्रो प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर पूर्ण होतोय. पीएमआरडीए, टाटा समूह, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्या माध्यमातून याचे काम सुरु आहे. यामुळे विद्यापीठ चौक, गणेशखिंड रस्ता, हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

आयुक्तांनी दिली मोठी माहिती 

पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून बहुतांश स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत १० पेक्षा जास्त ट्रेनसेट प्राप्त झाले असून, लवकरच एकूण २२ ट्रेनसेट उपलब्ध होतील. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांच्या सेवेत दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe