Lucky Rashi : ज्योतिषशास्त्रात मानवी जीवनाचा वेध जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळाच्या आधारे घेतला जातो.
कुंडली, ग्रहांची स्थिती, १२ राशी, २७ नक्षत्रे, मूलांक-भाग्यांक यांचा अभ्यास करून व्यक्तीचा स्वभाव, तिचे आयुष्यातील चढ-उतार, तसेच कुटुंबावर होणारा प्रभाव सांगितला जातो.

याच पार्श्वभूमीवर ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, १२ राशींमध्ये काही राशींच्या महिलांना साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशा महिला जन्मत:च आपल्या आई-वडिलांसाठी भाग्यवर्धक ठरतात आणि विवाहानंतर पती व सासरकुटुंबासाठीही सौख्य, समृद्धी घेऊन येतात.
यामध्ये सर्वप्रथम उल्लेख होतो तो तूळ राशीच्या महिलांचा. शुक्र ग्रहाच्या अधिपत्याखाली असलेल्या या राशीच्या मुली आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या, समतोल विचारांच्या आणि प्रेमळ स्वभावाच्या असतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, त्यांच्या पायगुणामुळे घरात आर्थिक स्थैर्य येते. वडील असोत किंवा पती, त्यांच्या आयुष्यात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात. या महिला नातेसंबंध जपण्यात पुढे असतात, त्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होते. मात्र सौंदर्य आणि आरामावर खर्च करण्याची त्यांची आवड कधी कधी खर्चीक ठरू शकते.
दुसऱ्या क्रमांकावर आहेत मीन राशीच्या महिला. गुरू ग्रहाच्या कृपेने या राशीच्या मुलींमध्ये संयम, समजूतदारपणा आणि आध्यात्मिक ओढ दिसून येते. त्या संवेदनशील, कलात्मक आणि मनाने खूप श्रीमंत असतात.
त्यांच्या उपस्थितीने घरात शांतता आणि स्थैर्य नांदते. विवाहानंतर या महिला पतीच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलतात. घर सजवणे, कुटुंबाला एकत्र ठेवणे आणि कठीण काळात धीर देणे, हे गुण त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवतात.
तिसरी महत्त्वाची रास म्हणजे कर्क. चंद्राच्या प्रभावामुळे या राशीच्या महिला भावनाशील, प्रेमळ आणि कुटुंबवत्सल असतात. त्या आपल्या पतीवर नितांत प्रेम करतात आणि आयुष्यभर त्याची साथ निष्ठेने निभावतात. सून म्हणूनही त्या जबाबदारीने नातेसंबंध जपतात. ज्योतिषानुसार, त्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी फारशा टिकत नाहीत.
एकूणच, या राशींच्या महिलांमध्ये केवळ आर्थिकच नव्हे तर भावनिक समृद्धी देण्याची ताकद असते. त्यामुळे त्यांना साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते.












