मुंबई, पुणे, नागपूर, ठाणेनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरात धावणार मेट्रो !

Published on -

Maharashtra Metro News : राज्यातील आणखी एका शहरात मेट्रो सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक शहरात लवकरच मेट्रो सुरु होणार आहे. मंडळी, नाशिककरांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरू शकणारी बातमी समोर आली आहे.

नाशिक शहरात नियमित मेट्रो सेवा सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, महामेट्रोने केलेल्या ताज्या वाहतूक सर्वेक्षणात मेट्रोसाठी आवश्यक असलेली किमान प्रवासी संख्या पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोणत्याही शहरात मेट्रो सुरू करण्यासाठी गर्दीच्या वेळेत प्रतितास किमान २० हजार प्रवासी असणे आवश्यक मानले जाते. महामेट्रोच्या सर्वेक्षणानुसार नाशिकमध्ये हा आकडा ओलांडण्यात आला असून, त्यामुळे सिंहस्थनगरीत नियमित मेट्रो प्रकल्प राबविण्यात आता तांत्रिक अडथळे उरलेले नाहीत.

यापूर्वी नाशिकमध्ये पुरेशी प्रवासी संख्या नसल्याचे कारण पुढे करत कधी टायरबेस मेट्रो निओ, तर कधी कॉम्पॅक्ट मेट्रो असे पर्याय सुचवले जात होते. त्या आधारे सुमारे २१०० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला होता.

मात्र, गेल्या पाच वर्षांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने मेट्रो निओ प्रकल्प रखडलेला राहिला. या विलंबामुळे आता नाशिकसाठी नियमित मेट्रोचा विचार पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

नाशिक शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मात्र तुलनेने कमकुवत आहे. परिणामी खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, पार्किंग, ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण यांसारख्या समस्या गंभीर बनल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व महापालिकांना स्वतंत्र आणि सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नाशिक महापालिकेचा पहिला सर्वंकष वाहतूक आराखडा २०१६ मध्ये तयार करण्यात आला होता.

२०३६ सालातील लोकसंख्येचा अंदाज लक्षात घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यात सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरण, बससेवा, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, रस्तेविकास, मालवाहतूक आणि रहदारी व्यवस्थापनाचा समावेश होता.

या आराखड्याच्याच आधारे सिटीलिंक बससेवा सुरू झाली आणि पुढे मेट्रो निओचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, अलीकडील सर्वेक्षणात गर्दीच्या वेळेत प्रतितास २० हजार प्रवासी असल्याचे स्पष्ट झाल्याने महामेट्रोने नियमित मेट्रोसाठी आराखडा तयार केला आहे. हा आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे सादर करण्यात आला असून, मंत्रालयात होणारे सादरीकरण बैठकीअभावी लांबले आहे.

पूर्वी प्रतितास केवळ १४ हजार प्रवासी असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे नाशिकला मेट्रो निओ सुचवण्यात आली होती. मात्र, आता प्रवासी संख्या वाढल्याने मेट्रो निओसाठी झालेला उशीर नाशिककरांच्या पथ्यावर पडला असून, शहराला अत्याधुनिक आणि नियमित मेट्रो सेवा मिळण्याची आशा बळावली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe