शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पावसामुळे खरीप कांद्याच्या क्षेत्रात मोठी वाढ; बाजारात आवक वाढल्याने दर घसरले,

Published on -

Onion Rate : सरासरीपेक्षा यंदा जास्त पाऊस झाल्याचा थेट परिणाम खरीप (लाल) कांद्याच्या लागवडीवर झाल्याचे चित्र समोर आले आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात खरीप कांद्याच्या क्षेत्रात तब्बल ५० हजार हेक्टरची वाढ नोंदवली गेली आहे.

गेल्या वर्षी जिथे लाल कांद्याची लागवड सुमारे १ लाख ०५ हजार हेक्टरवर होती, तिथे यंदा हे क्षेत्र वाढून १ लाख ५३ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे अजूनही काही भागांत लागवड सुरू असल्याने येत्या काळात क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कांदा उत्पादनात नाशिक जिल्हा राज्यात अग्रेसर मानला जातो. विशेषतः उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन येथे होते. या कांद्याची निर्यातही होते; मात्र केंद्र सरकारच्या निर्यात धोरणातील सततच्या बदलांमुळे कांद्याच्या दरांवर मोठा परिणाम होत असल्याचे व्यापारी आणि शेतकरी सांगतात. कधी निर्यात बंदी, तर कधी किमान निर्यात दर (MEP) लागू केल्याने बाजारातील स्थैर्य ढासळते.

सध्या बाजारात खरीप (लाल) कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दरात सातत्याने घसरण होत असून, प्रतिक्विंटल कांद्याला केवळ एक हजार ते १२०० रुपये इतकाच भाव मिळत आहे.

हा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांचा खर्चही भरून निघत नाही. परिणामी, शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून नाराजी व्यक्त करत आहेत.

तरीही कांद्याची लागवड थांबलेली दिसत नाही. यामागे यंदाचा अतिवृष्टीचा हंगाम हे प्रमुख कारण आहे. जास्त पावसामुळे अनेक ठिकाणी रोपे खराब झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना उशिरा बियाणे टाकावे लागले आणि लागवडही उशिरा झाली. गेल्या आठवड्यातच सुमारे ३८ हजार ७०२ हेक्टरवर कांद्याची लागवड झाल्याची नोंद आहे.

दरम्यान, बांगलादेशातून कांद्याची मागणी असली तरी देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने त्याचा दरांवर फारसा सकारात्मक परिणाम झालेला नाही.

स्थानिक बाजार समित्यांमध्ये सध्या दर दबावातच असून, दरातील घसरण सुरूच असल्याचे चित्र आहे. योग्य दर न मिळाल्यास आगामी काळात शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News