EPFO News : केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत येणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. लवकरच EPFO कडून प्रोव्हिडंड फंड (PF) खात्यांमध्ये वार्षिक व्याजाची रक्कम जमा केली जाणार आहे.
ही रक्कम अतिरिक्त पेमेंटप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून, अनेक सदस्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. काही कर्मचाऱ्यांच्या खात्यात तब्बल 46 हजार रुपयांपर्यंतची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, ही रक्कम प्रत्येक सदस्याच्या पीएफ खात्यातील शिल्लक रकमेवर अवलंबून असेल.

EPFO दरवर्षी आर्थिक वर्षाच्या अखेरीस सदस्यांच्या पीएफ बॅलन्सवर व्याज जमा करते. चालू आर्थिक वर्षात EPFO ने 8.25 टक्के इतका व्याजदर जाहीर केला होता. या व्याजदरानुसार खात्यातील जमा रकमेवर व्याज मोजले जाते आणि ते थेट सदस्यांच्या खात्यात क्रेडिट केले जाते.
त्यामुळे ज्यांच्या खात्यात मोठी शिल्लक रक्कम आहे, अशा कर्मचाऱ्यांना जास्त व्याजाचा लाभ मिळतो. याच कारणामुळे काही सदस्यांच्या खात्यात 40 ते 46 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा होऊ शकते, तर काहींना तुलनेने कमी रक्कम मिळेल.
महत्त्वाचे म्हणजे, ही व्याजाची रक्कम आपल्याला मिळाली आहे की नाही, हे प्रत्येक कर्मचारी स्वतः तपासू शकतो. यासाठी EPFO चे अधिकृत पोर्टल किंवा UMANG अॅपचा वापर करता येतो.
EPFO पोर्टलवर UAN क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करून ‘Passbook Lite’ पर्यायातून पीएफ बॅलन्स आणि व्याजाची नोंद पाहता येते. तसेच UMANG अॅपद्वारेही काही सोप्या स्टेप्समध्ये पीएफ पासबुक डाऊनलोड करून शिल्लक रक्कम तपासता येते.
दरम्यान, कर्मचाऱ्यांचे लक्ष आता 2025-26 या आर्थिक वर्षासाठी जाहीर होणाऱ्या नवीन व्याजदराकडे लागले आहे. हा व्याजदर सध्याच्या तुलनेत अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जर तसे झाले, तर पुढील वर्षी EPFO सदस्यांच्या खात्यात आणखी मोठी व्याजरक्कम जमा होऊ शकते. त्यामुळे पीएफ खात्यात नियमित बचत करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही खऱ्या अर्थाने आर्थिक ‘लॉटरी’ ठरणार आहे.













