Gold-Silver Rate : देशातील आर्थिक चित्रात सध्या दोन टोकाची स्थिती पाहायला मिळत आहे. एकीकडे बँकांच्या ठेवींवरील व्याजदरात सातत्याने कपात होत असल्याने पारंपरिक गुंतवणूकदार नाराज आहेत, तर दुसरीकडे सोनं-चांदीच्या दरांनी रोज नवे उच्चांक गाठत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
विशेषतः सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये सोनं-चांदीच्या दरवाढीचा थेट परिणाम ग्राहक आणि गुंतवणूकदारांवर होताना दिसत आहे.

कमी व्याजदरामुळे बँकांतील मुदतठेवीतून अपेक्षित परतावा मिळत नसल्याने अनेक गुंतवणूकदारांनी एफडी मोडून सोनं-चांदीकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या काही आठवड्यांत सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये झालेल्या मोठ्या उसळीमुळे राज्यभरातील सराफा बाजार तापले असून गुंतवणूकदारांची गर्दी वाढली आहे.
बुलियन मार्केटच्या ताज्या आकडेवारीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅममागे 1 लाख 56 हजार 700 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर किलोमागे तब्बल 3 लाख 35 हजार 420 रुपये इतका झाला आहे.
अवघ्या एका महिन्यात सोन्याच्या दरात सुमारे 20 हजार रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या किमतीत तर ऐतिहासिक उसळी पाहायला मिळाली आहे. यामुळे सोन्यात जवळपास 14 टक्के आणि चांदीत सुमारे 50 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाल्याने गुंतवणूकदार अक्षरशः मालामाल झाले आहेत.
या दरवाढीमागे जागतिक बाजारातील अस्थिरता प्रमुख कारण ठरत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या आर्थिक धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अनिश्चितता वाढली आहे.
ग्रीनलँड संकटासारखे भू-राजकीय तणाव, संभाव्य व्यापार युद्धाची भीती, तसेच अमेरिकन डॉलरची कमकुवतता आणि जपानी सरकारी रोख्यांतील घसरण यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत.
एकूणच, बँक व्याजदरातील घट आणि मौल्यवान धातूंमधील वाढता परतावा यामुळे जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात सोनं-चांदी गुंतवणुकीचा ट्रेंड पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे.













