Amrut Bharat Express Train : जळगावकरांसाठी तसेच खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून पनवेल–अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेस (DN-11031 / UP-11032) ही नवीन गाडी सुरू करण्यात आली असून या गाडीला जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशातील प्रवाशांना थेट लाभ होणार आहे.
ही अमृत भारत एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालला थेट जोडणारी महत्त्वाची रेल्वे सेवा ठरणार आहे. विशेष म्हणजे पनवेलहून ईशान्य भारताकडे जाण्यासाठी ही गाडी एक जलद आणि सोयीस्कर पर्याय ठरेल.

रेल्वे वेळापत्रकानुसार, ट्रेन क्रमांक 11031 पनवेल जंक्शन–अलीपुरद्वार जंक्शन अमृत भारत एक्सप्रेस दर सोमवारी सकाळी 11.50 वाजता पनवेल जंक्शनवरून सुटेल. ही गाडी तब्बल दोन दिवसांचा प्रवास करून बुधवारी दुपारी 1.50 वाजता अलीपुरद्वार जंक्शन येथे पोहोचेल.
तर, परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक 11032 अलीपुरद्वार जंक्शन–पनवेल जंक्शन अमृत भारत एक्सप्रेस दर गुरुवारी पहाटे 4.45 वाजता अलीपुरद्वार जंक्शनवरून सुटेल आणि शनिवारी पहाटे 5.30 वाजता पनवेल जंक्शन येथे दाखल होईल.
या अमृत भारत एक्सप्रेसला कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, मिर्झापूर, पं. दीन दयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, कटिहार, न्यू जलपाईगुडी आणि सिलीगुडी अशा अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
या गाडीमुळे जळगाव आणि भुसावळ परिसरातील प्रवाशांना उत्तर भारत तसेच ईशान्य भारतात प्रवास करणे अधिक सुलभ होणार आहे. व्यापार, शिक्षण, नोकरी तसेच पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा मोठा फायदा होणार असून खान्देशातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे. एकूणच, ही नवीन अमृत भारत एक्सप्रेस जळगाव जिल्ह्यासाठी रेल्वे सुविधांच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.













