Amrut Bharat Express : देशातील पर्यटन वाढावे आणि पूर्व-पश्चिम भारतातील शहरे अधिक घट्टपणे जोडली जावीत, या उद्देशाने भारतीय रेल्वेने आणखी एक महत्त्वाची पायरी उचलली आहे. महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगावहून थेट दार्जिलिंगकडे जाण्याचा मार्ग खुला करणारी अलिपूरद्वार–मुंबई (पनवेल) अमृत भारत एक्स्प्रेस सेवा सुरू करण्यात आली आहे.
या नव्या सेवेचा फायदा महाराष्ट्रासह पाच राज्यांना होणार असून उत्तर बंगाल आणि उत्तर महाराष्ट्र यांच्यातील थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रथमच मजबूत झाली आहे.

भारत–भूतान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या अलिपूरद्वार येथून सुरू होणारी ही साप्ताहिक अमृत भारत एक्स्प्रेस पूर्व भारत आणि पश्चिम किनारपट्टी यांना जोडणारा एक महत्त्वाचा पूर्व–पश्चिम रेल्वे कॉरिडॉर ठरणार आहे.
या मार्गावरून पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही पाच राज्ये जोडली जाणार आहेत. सीमावर्ती आणि संवेदनशील भागातील वाहतूक सुलभ होण्यासोबतच राष्ट्रीय कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल, असा विश्वास रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
वेळापत्रक कसे असेल?
अलिपूरद्वार–मुंबई (पनवेल) अमृत भारत एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी ४:४५ वाजता अलिपूरद्वारहून सुटेल आणि शनिवारी सायंकाळी ५:३० वाजता पनवेलला पोहोचेल.
तर पनवेल–अलिपूरद्वार अमृत भारत एक्स्प्रेस सोमवारी सकाळी ११:५० वाजता पनवेलहून निघून बुधवारी दुपारी १:५० वाजता अलिपूरद्वार गाठेल. महाराष्ट्रात ही ट्रेन कल्याण, नाशिक रोड, जळगाव आणि भुसावळ येथे थांबणार आहे.
पर्यटनाला नवी दिशा
हा मार्ग अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांना जोडणारा आहे. दार्जिलिंगचे चहाचे मळे आणि हिमालयीन दृश्ये, प्राचीन बौद्ध शिक्षण केंद्र विक्रमशिला महाविहार, महाबोधी मंदिर, त्रिवेणी संगम, चित्रकूट धाम तसेच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या सर्व स्थळांपर्यंत जाणे या एका रेल्वेमुळे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्ग पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
अमृत भारत एक्स्प्रेसची वैशिष्ट्ये
अमृत भारत गाड्या पूर्णपणे नॉन-एसी असून त्यात ११ सामान्य डबे, ८ शयनयान डबे, एक पॅन्ट्री कार तसेच द्वितीय श्रेणी व साहित्य डबे असतात.
सध्या देशात ३० अमृत भारत एक्स्प्रेस कार्यरत असून नव्या सेवेमुळे महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना विशेष लाभ होणार आहे. एकूणच, ही रेल्वे सेवा पर्यटन, व्यापार आणि सामाजिक कनेक्टिव्हिटीसाठी ‘गेमचेंजर’ ठरणार आहे.













