रब्बी हंगामाच्या तोंडावर हरभरा-तूर बाजारात विरोधाभास; हरभऱ्याचे दर घसरले, तुरीला अचानक तेजी

Published on -

Harbhara-Tur Market : रब्बी हंगाम सुरू होत असतानाच जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हरभरा आणि तूर या प्रमुख कडधान्यांच्या दरांमध्ये विरोधाभासी चित्र पाहायला मिळत आहे. हरभऱ्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी निराश झाले असताना, तुरीच्या दरात अचानक वाढ झाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारने २०२५-२६ च्या रब्बी हंगामासाठी हरभऱ्याचा किमान आधारभूत दर (MSP) प्रतिक्विंटल ५ हजार ६५० रुपये जाहीर केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा दर २१० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष बाजारात हा हमीभाव शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही.

वाशिम जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या हरभऱ्याची सरासरी खरेदी सुमारे ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने होत आहे. हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

खते, बियाणे, औषधे, मजुरी आणि सिंचन खर्चात मोठी वाढ झालेली असताना बाजारात अपेक्षित दर न मिळाल्याने हरभरा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हमीभाव असूनही प्रत्यक्ष खरेदी कमी दराने होत असल्याने सरकारकडून हस्तक्षेपाची मागणी शेतकरी करत आहेत.

दुसरीकडे, तुरीच्या दरात मात्र तेजी दिसून येत आहे. यंदा तुरीसाठी केंद्र सरकारने प्रतिक्विंटल ८ हजार रुपये हमीभाव जाहीर केला आहे. गेल्या वर्षभरात तुरीचे दर ६ हजार ५०० ते ६ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान स्थिर होते. मात्र, सध्या बाजारात तुरीचे दर ७ हजार ५०० रुपयांवर पोहोचले असून काही बाजार समित्यांमध्ये नवीन तुरीला थेट ८ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याची माहिती आहे.

यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस आणि अतिवृष्टीमुळे अनेक भागात तुरीचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला, तर ढगाळ वातावरणामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे एकूण उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या नवीन तुरीची आवक सुरू झाली असली तरी गावरान तुरीचा मुख्य हंगाम जानेवारी अखेरनंतर जोरात सुरू होणार आहे. पुढील काळात आवक वाढल्यानंतर तुरीचे दर टिकून राहतात की आणखी वाढतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News