Ration Card News : शासनाने रेशन कार्डसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया अद्याप पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांना आता मोठा धोका निर्माण झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील तब्बल २.३७ लाख रेशन कार्डधारकांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सतीश अगडे यांनी दिली.
सर्वसामान्यांना स्वस्त दरात धान्य मिळवून देण्यासाठी चालणाऱ्या सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये (PDS) पारदर्शकता आणण्यासाठी आणि बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे.

रेशन कार्डवरील प्रत्येक सदस्याचे आधार प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे. जे लाभार्थी ही प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांना सरकार ‘अपात्र’ समजेल आणि त्यांच्या रेशन कार्डवरील धान्यपुरवठा त्वरित थांबवला जाईल.
जिल्ह्यात आतापर्यंत ९ लाख १३ हजार लाभार्थ्यांनी यशस्वीरित्या ई-केवायसी पूर्ण केली आहे. मात्र, २ लाख ३७ हजार लाभार्थी अद्याप या प्रक्रियेत मागे आहेत. प्रशासनाने चेतावणी दिली आहे की, दिलेल्या मुदतीत ई-केवायसी न केल्यास त्यांचे नाव रेशन कार्डमधून कायमचे हटवले जाईल.
एकदा नाव हटवले की, पुन्हा रेशन कार्डमध्ये समाविष्ट करण्यासाठी मोठी शासकीय कसरत करावी लागेल, ज्यामध्ये कागदपत्रे गोळा करणे, तहसील कार्यालयात फेऱ्या मारणे आणि वेळखाऊ प्रक्रिया पार करावी लागते.
ई-केवायसी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. रेशन कार्डमधील सर्व सदस्यांना घेऊन जवळच्या स्वस्त धान्य दुकानात (Ration Shop) जावे लागेल. तिथे ‘ई-पॉस’ (e-PoS) मशीनवर अंगठा लावून मोफत आधार प्रमाणीकरण करून प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते.
शासनाने अनेकदा मुदतवाढ दिली आहे, तरीही लाखो लोक अद्याप ही प्रक्रिया पार पाडलेली नाही. आता ही शेवटची संधी असून, तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी लाभार्थ्यांनी त्वरित रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.
रेशनकार्डवर नाव कायम राखण्यासाठी आणि स्वस्त दरात धान्य मिळवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.













