Gold Rate : सोनं आणि चांदीच्या किमतीत सध्या सुरू असलेली झपाट्याने वाढ थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. गेल्या काही दिवसांत मौल्यवान धातूंच्या दरांनी अक्षरशः सर्व विक्रम मोडले असून गुंतवणूकदारांसह सामान्य ग्राहकांनाही मोठा आर्थिक धक्का बसला आहे. विशेषतः महाराष्ट्रातील सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये सोनं आणि चांदीच्या दरात भयानक उसळी पाहायला मिळत आहे.
जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 3 हजार 200 रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या दरात थेट 15 हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्या जीएसटीसह सोन्याचा दर 1 लाख 62 हजार 800 रुपये प्रति तोळा तर चांदीचा दर 3 लाख 50 हजार 500 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे.

हे दर आजवरच्या इतिहासातील सर्वोच्च पातळीवर आहेत. सलग चार ते पाच दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने तेजी सुरू असल्याने सराफ बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
लग्नसराईचा काळ सुरू असतानाच दरवाढ झाल्यामुळे ग्राहक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. लग्नासाठी दागिने खरेदी करणाऱ्या कुटुंबांचे बजेट कोलमडले असून अनेकांनी खरेदी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, गुंतवणूकदार मात्र या तेजीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत.
सोनं आणि चांदीच्या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी कारणीभूत ठरत आहेत. अमेरिका आणि इराणमधील वाढता संघर्ष, तसेच युक्रेन युद्धाच्या वाढत्या व्याप्तीमुळे जागतिक बाजारात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं आणि चांदीकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत.
याशिवाय सोलार पॅनल, इलेक्ट्रिक वाहने आणि एआय आधारित डेटा सेंटर्समध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढल्याने चांदीचा तुटवडा निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाल्यामुळे आयात होणारी चांदी आणि सोनं देशांतर्गत बाजारात अधिक महाग झाले आहे.
पुरवठ्यातील अडचणी आणि जागतिक तणाव कायम राहिल्यास येत्या काळात चांदीचे दर 4 लाख रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सोन्याचे दर 1 लाख 80 हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत जाण्याची शक्यता सुवर्ण व्यवसायिकांनी वर्तवली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सोन्या-चांदीच्या बाजारासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.













