ST Bus News : सलग सुट्यांचा फायदा घेत लांबपल्ल्याच्या खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकीट दर अव्वाच्या सव्वा वाढविल्याने सामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. पुणे, मुंबई, बेंगळूर, हैदराबाद, मंगळूर येथून बेळगावकडे जाणाऱ्या खासगी बसचे तिकीट दर एरव्हीपेक्षा तब्बल दुप्पट आकारले जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
यामुळे खासगी ट्रॅव्हल्सवर निर्बंध घालावेत किंवा परिवहन मंडळ व रेल्वेने पर्यायी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

२४ रोजी चौथा शनिवार, २५ रोजी रविवार आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सुटी असल्याने नोकरदारांना सलग तीन दिवसांची सुटी मिळाली आहे. याचा फायदा घेत महानगरांमध्ये नोकरी करणारे अनेकजण गावी परतण्यासाठी निघाले आहेत.
मात्र या काळात रेल्वे आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसेस पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे अनेक प्रवाशांना नाइलाजाने खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडावा लागत आहे.
शुक्रवारी रात्री काम आटोपून मोठ्या संख्येने प्रवासी खासगी बसने बेळगावकडे रवाना झाले. पुणे–बेळगाव वातानुकुलित स्लीपर बससाठी सामान्यतः ६०० ते ७०० रुपये तिकीट आकारले जाते.
मात्र सलग सुट्यांचा गैरफायदा घेत हाच दर थेट १२०० ते १४०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आला. केवळ पुणेच नव्हे, तर बेंगळूर–बेळगाव, मुंबई–बेळगाव, हैदराबाद–बेळगाव आणि मंगळूर–बेळगाव या सर्वच मार्गांवर तिकीट दर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
या परिस्थितीत गर्दीच्या मार्गांवर सलग सुट्यांच्या काळात अधिक बसेस किंवा विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात, अशी मागणी प्रवासी व सामाजिक संघटनांकडून होत आहे. अन्यथा खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरांवर नियंत्रण आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दर वंदे भारत एक्सप्रेसपेक्षाही अधिक झाल्याने प्रवाशांचा कल रेल्वेकडे वळलेला दिसतो. पुणे–हुबळी वंदे भारत शनिवारी पूर्ण क्षमतेने भरली असून तिकीट बुकिंग वेटिंगवर गेले होते.
तसेच बेंगळूर–बेळगाव वंदे भारतलाही तुफान प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. यामुळे भविष्यात अशा सुट्यांच्या काळात अधिक नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था उभारण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.













