Mahindra Vision S SUV : महिंद्रा अँड महिंद्रा आपल्या आगामी एसयूव्ही पोर्टफोलिओवर जोरात काम करत असून, त्यातीलच एक महत्त्वाचे मॉडेल म्हणजे ‘महिंद्रा व्हिजन एस’ एसयूव्ही. जरी हे मॉडेल अधिकृतपणे केवळ कॉन्सेप्ट स्वरूपात सादर करण्यात आले असले, तरी अलीकडेच याचे टेस्टिंग मॉडेल भारतीय रस्त्यांवर दिसून आले आहे.
समोर आलेल्या स्पाय फोटोंवरून हे स्पष्ट होते की, महिंद्रा या एसयूव्हीच्या मेकॅनिकल आणि डिझाइन दोन्ही बाबींमध्ये अंतिम टप्प्यातील चाचण्या करत आहे.

टेस्टिंगदरम्यान दिसलेल्या प्रोटोटाइपमध्ये कॉन्सेप्टप्रमाणेच सरळ, बॉक्सी आणि दमदार डिझाइन पाहायला मिळते. समोर गोलाकार हेडलाइट्स, उभी ग्रील आणि हॅलोजन टर्न इंडिकेटर्स दिले असून, यामुळे या एसयूव्हीला क्लासिक ऑफ-रोडर लूक मिळतो. विशेष म्हणजे, डिझेल फिलरजवळ असलेली ॲडब्लू रिफिल कॅप ही BS6 फेज II कंप्लायंट डिझेल इंजिनची पुष्टी करते.
या टेस्ट मॉडेलच्या इंटीरियरचीही थोडी झलक मिळाली आहे. यात ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, नवीन महिंद्रा लोगो असलेले स्टीयरिंग व्हील, इंटिग्रेटेड कंट्रोल्स, फॅब्रिक सीट्स आणि कव्हर्ड इन्फोटेनमेंट सिस्टम दिसते.
याशिवाय डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 60:40 स्प्लिट रेशोमध्ये मागील सीट्स, वैयक्तिक हेडरेस्ट्स आणि पॅनोरॅमिक ग्लास सनरूफसारखी प्रीमियम फीचर्सही या एसयूव्हीत देण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.
महिंद्रा व्हिजन एस ही कंपनीच्या नवीन NUIQ (एनयूआयएक्यू) प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. हा मोनोकॉक प्लॅटफॉर्म 4 मीटरपेक्षा कमी ते सुमारे 4.5 मीटर लांबीच्या एसयूव्हीसाठी डिझाइन करण्यात आला असून, 2.65 मीटर व्हीलबेस, 28 डिग्री ॲप्रोच अँगल, 34.9 डिग्री डिपार्चर अँगल आणि 28.2 डिग्री ब्रेकओव्हर अँगल देतो.
चांगल्या राईड क्वालिटीसाठी फाइव्ह-लिंक रिअर सस्पेंशनही यात असणार आहे. इंजिन पर्यायांबाबत बोलायचे झाल्यास, व्हिजन एस पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये येण्याची शक्यता आहे.
पेट्रोल व्हर्जनमध्ये XUV 3XO मधील 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, तर डिझेल व्हर्जनमध्ये एंट्री-लेव्हल थारमधील 1.5-लिटर डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. दमदार लूक, आधुनिक फीचर्स आणि ऑफ-रोड क्षमतेमुळे ही एसयूव्ही सब-4 मीटर सेगमेंटमध्ये महिंद्रासाठी गेमचेंजर ठरू शकते.













