आयआयटी बॉम्बेचा ‘जीवोदय’ प्रकल्प : रेशीम उत्पादनात मानवी आणि पर्यावरणपूरक क्रांती

Published on -

IIT Bombay Research : भारतातील नामांकित आयआयटी बॉम्बेने रेशीम उत्पादन क्षेत्रात ऐतिहासिक आणि क्रांतीकारी बदल घडवून आणणारी नवी पद्धत विकसित केली आहे. ‘जीवोदय’ असे नाव देण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे आता रेशीमकीटकांना मारल्याशिवाय रेशीम उत्पादन करणे शक्य झाले आहे.

कोल इंडियाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत या संशोधनाला पूर्ण पाठिंबा देण्यात आला असून, सलग तीन वर्षांच्या संशोधन व प्रयोगांनंतर हे यश मिळाले आहे.

पारंपरिक रेशीम उद्योगात रेशीमकीटक मलबेरीची पाने खाऊन कोकून तयार करतात. त्यानंतर हे कोकून उकळून त्यातील धागा काढला जातो. या प्रक्रियेत लाखो रेशीमकीटकांचा मृत्यू होतो. ही पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असली तरी पर्यावरण आणि नैतिकतेच्या दृष्टीने नेहमीच वादग्रस्त राहिली आहे.

‘जीवोदय’ तंत्रज्ञान या पारंपरिक प्रक्रियेपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. या पद्धतीत रेशीमकीटकांना मलबेरीची पाने खाऊ घालून, त्यांना सपाट पृष्ठभागावर रेशीम धागे विणण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.

त्यामुळे कीटक कोकून तयार करत नाहीत. आवश्यक तेवढे रेशीम धागे मिळाल्यानंतर कीटकांना कोणतीही हानी न पोहोचवता सोडले जाते. पुढे हे कीटक नैसर्गिकरित्या पतंगात (मॉथ) रूपांतरित होतात आणि त्यांचे जीवनचक्र पूर्ण करून उडून जातात.

या नव्या तंत्रज्ञानामुळे रेशीम शेतकऱ्यांना शाश्वत आणि स्थिर उत्पन्नाचा नवा मार्ग खुला होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी आणि महिला बचत गटांसाठी हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो.

कमी खर्चात, पर्यावरणस्नेही आणि नैतिकदृष्ट्या योग्य पद्धतीने तयार होणाऱ्या ‘जीवोदय सिल्क’ ला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लाखो रेशीमकीटकांचे प्राण वाचवूनही दर्जेदार आणि सुंदर रेशीम मिळवता येते, हे या प्रकल्पाने सिद्ध केले आहे. विज्ञान, करुणा आणि शाश्वत विकास यांचा सुंदर संगम म्हणजे आयआयटी बॉम्बेचा ‘जीवोदय’ प्रकल्प असून, तो भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा आणि मानवतावादी दृष्टिकोनाचा अभिमानास्पद नमुना ठरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe