लाडकी बहीण योजनेत मोठा दिलासा; तीन महिन्यांचा हप्ता एकत्र, थेट ४५०० रुपये मिळणार

Published on -

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेने राज्यातील लाखो महिलांना थेट आर्थिक आधार दिला. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपयांची मदत दिली जाते.

विशेष म्हणजे या योजनेचा राजकीयदृष्ट्याही मोठा परिणाम दिसून आला असून, महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्यात या योजनेचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते.

मात्र, या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडत असल्याची चर्चा सातत्याने सुरू होती. इतर विभागांचा निधी वळवून लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात आल्याचे आरोपही झाले.

याच दरम्यान काही महिलांना हप्ता वेळेवर न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत थेट रस्त्यावर उतरावे लागले. अनेक महिलांचे केवायसी पूर्ण न झाल्यामुळे हप्ते थांबवण्यात आले, तर काही महिलांनी ई-केवायसी करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याची तक्रार केली.

या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने कठोर भूमिका घेत, संबंधित महिलांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले. योजनेसाठी अर्ज करताना ठरवण्यात आलेल्या नियम व अटी काही लाभार्थ्यांनी डावलल्याचे समोर आले असून, सध्या सर्व अर्जांची सखोल पडताळणी सुरू आहे.

दरम्यान, लाडक्या बहिणींसाठी आता अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पात्र महिलांच्या खात्यात थेट ४५०० रुपये जमा होणार आहेत.

काही महिलांना आधीच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला असला तरी, अनेक महिलांचे तीन महिन्यांचे पैसे प्रलंबित होते. हे सर्व पैसे आता एकरकमी मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना भविष्यात मासिक हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे संकेत दिले आहेत.

अधिवेशनानंतर संबंधित खाते पुन्हा महायुतीकडे येईल आणि महिलांना २१०० रुपये दिल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे येत्या काळात लाडक्या बहिणींना अधिक आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe