Bullet Train : पुणे-मुंबई आणि पुणे-हैदराबाद या दोन महत्त्वाच्या मार्गांवर प्रस्तावित असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प राज्याच्या पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक बदल घडवणार ठरणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन (NHSRCL) मार्फत या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून, दोन्ही मार्ग दुहेरीकरणाचे (डबल ट्रॅक) असणार आहेत.
पुणे ते मुंबईदरम्यान घाट परिसरात सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर बोगदे व पूल उभारले जाणार असून, त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित व जलद होणार आहे.

लोणावळा परिसरात भौगोलिक अडचणी असल्याने तेथे थेट बुलेट ट्रेन स्थानक उभारणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लोणावळ्याऐवजी कामशेत परिसरात स्थानक प्रस्तावित करण्यात आले आहे.
याशिवाय आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीमध्येही बुलेट ट्रेनचे स्वतंत्र स्थानक उभारण्याचा प्रस्ताव आहे. पुणे शहरातील बुलेट ट्रेनचे मुख्य स्थानक हडपसर भागात उभारले जाणार आहे.
यासाठी सुमारे ४ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, स्थानकाची रचना ताशी ३५० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या ट्रेनमुळे निर्माण होणाऱ्या हवेच्या दाबाचा विचार करून अत्याधुनिक पद्धतीने केली जाणार आहे.
पुण्याच्या मध्यवर्ती भागात पुरेशी जागा उपलब्ध नसणे, जमिनीचे जास्त दर आणि भूसंपादनातील अडचणी यामुळे हडपसरची निवड करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आणि मेट्रो सेवेशी थेट जोडणी हडपसरसाठी मोठा लाभ ठरणार आहे.
२०२१-२२ मध्ये मुंबई-पुणे-हैदराबाद या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला असून, आता मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर नव्या डीपीआरची आवश्यकता नसून केवळ तांत्रिक अवलोकन केले जाणार आहे. निधी उपलब्ध होताच पुणे-मुंबई आणि पुणे-हैदराबाद या दोन्ही मार्गांवर एकाच वेळी काम सुरू होणार असून, ५ ते ७ वर्षांत प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
बुलेट ट्रेन ताशी ३५० किमी वेगाने धावणार असून, एका किलोमीटर ट्रॅकसाठी सुमारे २५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. काही ठिकाणी उन्नत मार्ग ७ ते १० मीटर उंचीवर असेल. या दोन मार्गांसाठी एकूण अंदाजे २ लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पहिल्या टप्प्यात देशभरात ४ हजार किलोमीटर अंतरावर बुलेट ट्रेन धावणार असून, दुसऱ्या टप्प्यात आणखी शहरे जोडून हे जाळे ७ हजार किलोमीटरपर्यंत विस्तारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.













