DA Hike : महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी केंद्र व राज्य अशा दोन्हीही प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक राहणार आहे. मंडळी, जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) 2 टक्क्यांची वाढ अखेर निश्चित करण्यात आली आहे.
ही वाढ ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक (AICPI – IW) च्या आधारे ठरवण्यात आली असून, यासंदर्भातील अधिकृत आकडेवारी कामगार व रोजगार मंत्रालयाने नुकतीच जाहीर केली आहे. यावरून आता जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार हे क्लिअर झाले आहे.

AICPI च्या आधारावर डी.ए. वाढ निश्चित
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा दर सहा महिन्यांनी बदलत असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर दरवर्षी जानेवारी व जुलै महिन्यात ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर DA निश्चित केला जातो. अर्थातच जानेवारी महिन्यातील डी.ए. वाढ ही मागील वर्षातील जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांच्या निर्देशांकाच्या सरासरीवर अवलंबून असते.
डिसेंबर 2025 चा निर्देशांक जाहीर
कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत 30 जानेवारी 2026 रोजी डिसेंबर 2025 चा AICPI निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे. यात डिसेंबर महिन्याचा निर्देशांक 148.2 इतका राहिलाय. मागील वर्षाच्या दुसऱ्या सहा महिन्यांच्या सरासरीत झालेल्या वाढीच्या आधारे जानेवारी 2026 पासून 2 टक्के डी.ए. वाढ निश्चित करण्यात येईल अशी माहिती कर्मचारी संघटनांकडून देण्यात आली आहे.
किती वाढणार महागाई भत्ता ?
सदर निर्देशांकाच्या आधारावर सध्या लागू असलेल्या महागाई भत्त्यावर 2 टक्क्यांची भर पडणार असून, याचा थेट फायदा केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना होणार आहे. वाढीव डी.ए.मुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात थोडीशी पण दिलासादायक वाढ होणार आहे.
ही वाढ जानेवारी 2026 पासून लागू होणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे. ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असली तरी देखील याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हा मार्च महिन्यात जारी होईल अशी शक्यता आहे.
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार या संदर्भातील निर्णय घेणार असा दावा केला जात आहे. गेल्या वर्षी पण याच कालावधीत महागाई भत्ता वाढ मंजूर करण्यात आली होती आणि यंदाही तशीच स्थिती आहे. नक्कीच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला तर लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे.
कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा
वाढीव डी.ए. जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. यावेळी नेहमी प्रमाणे थकबाकी (Arrears) मिळण्याची शक्यता आहे. यामुळे महागाईच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दिलासा मिळेल. एकूणच, वाढत्या महागाईच्या काळात सरकारने दिलेला हा निर्णय सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी सकारात्मक आणि दिलासादायक ठरणारा आहे.













