पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर गॅस टँकर अपघात; २० तासांहून अधिक काळ महामार्ग ठप्प, हजारो प्रवासी अडकले

Published on -

Pune Mumbai Traffic : पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. आडोशी बोगद्याजवळ प्रोपलेन गॅस वाहून नेणारा टँकर तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला.

अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली.

प्रोपलेन गॅस हा अत्यंत ज्वलनशील आणि स्फोटक असल्याने कोणताही धोका टाळण्यासाठी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तत्काळ रोखण्यात आली.

सुमारे सहा ते सात तासांनंतर मध्यरात्रीनंतर एका लेनवरून संथ गतीने वाहने सोडण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र टँकरमधील गॅस गळती पूर्णपणे थांबलेली नसल्याने वाहतुकीचा वेग अत्यंत मंद असून अद्यापही धोका कायम आहे.

या घटनेमुळे एक्सप्रेस-वे तसेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मिळून तब्बल २० ते २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गेल्या २० तासांहून अधिक काळ महामार्ग वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकला असून हजारो प्रवासी अडचणीत सापडले आहेत.

या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. अनेक वाहनचालक पहाटे ३ ते ४ वाजल्यापासून एकाच ठिकाणी अडकले असून काही प्रवाशांच्या महत्त्वाच्या विमानप्रवासाच्या वेळा चुकल्या आहेत. कॅन्सरग्रस्त रुग्ण, तातडीच्या उपचारासाठी निघालेल्या रुग्णवाहिका या कोंडीत अडकल्याची माहिती समोर आली आहे.

महामार्गावर अन्न, पाणी व शौचालयांची कोणतीही पुरेशी व्यवस्था नसल्याने महिला, लहान मुले आणि वृद्धांचे विशेष हाल होत आहेत. “आम्ही भरमसाठ टोल भरतो, पण आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन इतके असहाय्य का?” असा संतप्त सवाल अनेक वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, लोणावळा-खंडाळा घाट परिसरात भीषण वाहतूक कोंडी झाल्याने प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

ताम्हिणी घाट मार्ग (पुणे-पौड-ताम्हिणी-माणगाव-मुंबई) तसेच माळशेज घाट मार्ग (पुणे-चाकण-नारायणगाव-माळशेज-कल्याण/ठाणे) हे पर्याय सुचवण्यात आले आहेत. मात्र या मार्गांनी प्रवास करताना ३ ते ५ तासांचा अतिरिक्त वेळ लागू शकतो, त्यामुळे प्रवाशांनी पुरेसे इंधन व पिण्याचे पाणी सोबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe