विद्यापीठांतून व्यावसायिक शिक्षण देणारे विविध प्रकारचे अभ्यासक्रम चालविले जातात. काही अभ्यासक्रम व्यावसायिक शिक्षणाव्यतिरिक्तही असतात. मात्र जपानच्या ओसाका शहरात इकुमेन विद्यापीठाने हल्लीच जो नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे, तो बहुधा जगातील एकाही विद्यापीठात घेतला जात नसेल.
या अभ्यासक्रमामध्ये तरुणांना चांगला पती तसेच पिता बनण्याच्या दृष्टीने तयार केले जाते. त्यांना स्वयंपाक करण्यापासून मुलांचे संगोपण करण्यापर्यंत विविध प्रकारचे धडे दिले जातात. गंमत म्हणजे या अभ्यासक्रमाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या तरुणांना प्लास्टिकपासून बनविलेल्या छोट्या बाळांद्वारे संगोपनाचे शिक्षण दिले जाते. सध्या त्यांना मुलांना आंघोळ घातल्यानंतर त्यांची कशी देखभाल करायची याचे धडे दिले जात आहेत. लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या तरुणांसाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
त्यात विद्यार्थ्यांनी सात किलोंचे प्रेग्नंसी जॅकेट परिधान करून मुलांचे कपडे बदलणे, त्यांना खाऊ घालणे आदी सगळे शिकविले जाते. वधूसंशोधन सुरू करण्यासोबतच अनेकजण या अभ्यासक्रमालाही प्रवेश घेत आहेत.
विवाह जुळवून देणाऱ्या जपानीमधील काही संस्थाही आपल्या जाहिरातीमध्ये अशा अभ्यासक्रमाचे महत्त्व सांगत आहे. तज्ज्ञही या अभ्यासक्रमाची आवश्यकता सांगत आहे. कारण गेल्यावर्षी जपानमध्ये फक्त ३ टक्के पुरुषांनीच पितृत्त्वाची रजा घेतली होती.