नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी भारताचाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. माजी कर्णधाराच्याच नेतृत्वाखाली भारताने आयसीसीच्या पहिल्या ट्वेण्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
पाठोपाठ आयसीसी चॅम्पियन्स करंडकही पटकावला. २०११ साली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उत्तुंग षटकार ठोकून धोनीने भारताला आयसीसी एकदिवसीय विश्वचषक मिळवून दिला. आयसीसीचे तिन्ही करंडक जिंकणारा महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेट जगतातील एकमेव कर्णधार आहे.

धोनीच्या ऐतिहासिक नेतृत्वाच्या कामगिरीचा शुभारंभ १४ सप्टेंबर २००७ रोजी झाला. त्या घटनेला शनिवारी बरोबर बारा वर्षे म्हणजेच एक तप पूर्ण झाले.
२००७ साली ट्वेण्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी धोनीची प्रथमच भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. भारताचा पहिला सामना १२ सप्टेंबर रोजी स्कॉटलंड संघाविरुद्ध होता. पण पावसामुळे तो सामना होऊ शकला नाही.
पुढील सामना १४ सप्टेंबर २००७ रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला गेला. अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचाच पराभव करून पहिला विश्वचषक पटकावण्याचा मान मिळवला. कर्णधार म्हणून धोनीच्या कारकीर्दीला बारा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त समाजमाध्यमांतून माहीवर स्तुतिसुमने उधळली गेली.
तेज गोलंदाज आर. पी. सिंगने धोनीच्या नेतृत्वाचा पैलू उलगडवून दाखवताना म्हटले, जेव्हा संघ विजयी होत असे, तेव्हा कर्णधार धोनी त्या सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला पत्रकार परिषदेला पाठवत असे.
जेव्हा संघ पराभूत होत असे, तेव्हा त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत धोनी पत्रकारांना सामोरे जात असे. समाजमाध्यमांतून एका चाहत्याने धोनीला कॅप्टन ऑफ कॅप्टन म्हटले आहे.
- शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! या तारखेला मिळणार Pm किसानचा पुढील हफ्ता
- आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता मूळ पगारात जोडला जाणार का ? केंद्र सरकारने स्पष्टचं सांगितलं
- पुण्यातील ‘या’ मेट्रो मार्गाच्या आराखड्यात मोठा बदल, नवीन स्टेशनं पण ऍड केले जाणार
- राज्यात तयार होणार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा 85 किलोमीटर लांबीचा नवा रेल्वेमार्ग !
- मोठी बातमी ! महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा, ‘या’ शहरात तयार होणार नवीन रेल्वेस्थानक













