अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- राज्यामध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन मध्ये सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती.
त्यानंतर मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले होते. तसेच दिवाळीचे औचित्य साधत महविकास आघाडी सरकारने धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी दिली. आता याच मुद्याचे भांडवल करण्याचे प्रयत्न राजकारण्यांकडून सुरु असल्याचे दिसून येत आहे.
करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील धार्मिक स्थळे आज पाडव्याला नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. ही धार्मिक स्थळे उघडल्यानंतर भाजपकडून त्याचे श्रेय घेण्याचा प्रकार सुरू असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मांडले आहे.
तसेच ‘भाजपने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करु नये,’ असा टोलाही रोहित पवार यांनी राज्यातील भाजप नेत्यांना लगावला आहे. दरम्यान राज्यात गेली अनेक महिने धार्मिक स्थळे बंदच ठेवण्यात आली होती. दुसरीकडे धार्मिक स्थळे उघडण्यात यावी, यासाठी भाजपसह विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात येत होते.
त्यातच पाडव्यापासून राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली. मात्र आता धार्मिक स्थळे उघडण्यावरून श्रेय घेण्याचे प्रकारही सुरू झाले असून त्यावरूनच आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
आमदार रोहित पवार ट्विट मध्ये म्हणतात…. ‘धार्मिक स्थळं उघडल्याचं श्रेय भाजप पेढे वाटून घेत असल्याचं मला पत्रकारांनी सांगितलं.
पण योग्य वेळी हा निर्णय घेणारं सरकार आणि करोनाला रोखण्यासाठी सहकार्य करणारी अध्यात्मिक-धार्मिक क्षेत्रातील मंडळी,भाविक व जनतेचा हा विजय आहे. भाजपने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करु नये,’ असा टोलाच पवार यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved